ठाणे : ‘फोनवर कोणाशी बोलते, माझ्याशी बोलायला वेळ नाही तुझ्याकडे, ठेव फोन’ असे खडसावल्याने महिलेने तिच्या पतीला आणि १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंब्रा शहरात पिडीत व्यक्ती राहतो. ४ जुलैला तो लवकर घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी स्वयंपाक घरामध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत होती. यामुळे संतापलेल्या त्या व्यक्तीने ‘फोनवर कोणाशी बोलते, माझ्याशी बोलायला वेळ नाही तुझ्याकडे, ठेव फोन’ असे म्हणाला. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांची मुलगी बचावासाठी आली असता, तिला तिच्या आईने बेदम मारहाण केली. त्यानंतर ती सोफ्यावर जाऊन बसली. काही वेळ वाद सुरू असतानाच, पुन्हा ती स्वयंपाक घरामध्ये गेली.
स्वयंपाक घरातील झाऱ्याने तिने तिच्या मुलीला बेदम मारहाण सुरु केली. तसेच पिडीत व्यक्तीचा मोबाईल देखील फेकून फोडला. या घटनेनंतर त्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अंतर्गत कलम ७५, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११५ (२),११८ (१), ३२४ (२), ३५१ (२) आणि ३५२ प्रमाणे महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.