ठाणे – कळवा येथील विटावा खाडीत एक तरूण उपनगरीय रेल्वेतून तोल जाऊन पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. या मुलाचा मृतदेह शुक्रवारी दुपारी सापडला असून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
आकाश शर्मा (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कळवा येथील घोलाई नगर परिसरात राहत होता. आकाश हा गुरुवारी कामानिमित्त उपनगरीय रेल्वेने मुलुंडला गेला होता. मुलुंडहून दुपारी १ वाजताच्या सुमारास तो रेल्वेने कळव्याला परतत होता. दरवाज्यात उभा राहून तो प्रवास करत होता. रेल्वे विटावा खाडीजवळ येताच, आकाशचा तोल गेला आणि तो खाडीत पडला.
या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- अग्निशमन वाहनासह आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान १ बससह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी स्थानिक लोक, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने स्थानिक मच्छीमारांच्या २ बोटीच्या सहाय्याने आकाशचे शोध कार्य सुरू होते. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरु होते. परंतू, अंधार पडायला लागल्यानंतर हे शोधकार्य थांबिवण्यात आले.
शुक्रवारी पहाटे ४ वाजल्यापासून पुन्हा स्थानिक मच्छीमार, अग्निशमन दल व आपत्ती प्रतिसाद दल यांच्यामार्फत हे शोधकार्य सुरु करण्यात आले होते. त्यावेळी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास विटावा ते दिघाच्या दरम्यान खाडीमध्ये स्थानिक मच्छीमार प्रथमेश खारकर, जितू खारकर आणि सुरेश विटावकर यांना आकाशचा मृतदेह आढळून आला. या स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद दल यांच्या जवानांनी आकाशचा मृतदेह बाहेर काढून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिला.