ठाणे : ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे स्वयंसहायता समूह उपक्रम आहे. गृहोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, शेती, पशुपालन अश्या विविध क्षेत्रात लघुउद्योग सुरू करून स्वयं सहायता समूहातील ४८ हजार ३९९ महिला लखपती दीदी बनल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात १० हजार ८२९ बचत गटांतील ४६ हजार ३९९ महिलांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक झाले आहे. याची नोंदणी डिजिटल आजीविका अँपवर करण्यात आली आहे. ग्रामीण महिलांना किमान दोन उपजिविकेची साधने मिळवून देणे हा लखपती दीदी योजनेचा मूळ उद्देश आहे. शेती, पशुपालन, व्यवसाय, लघुउद्योग किंवा डिजिटल सेवा सुरु करून, त्यातून त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न दरवर्षी १ लाख रुपयांच्या पुढे घेऊन जाणे अशी या योजेची रचना आहे. यासाठी महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण, कर्ज आणि कार्यशाळा यांचे आयोजन उमेद अभियानांतर्गत केले जाते, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली.
या योजनेचे उद्दिष्ट आणि लाभ
ग्रामीण महिलांना किमान दोन उपजिविकेची साधने उपलब्ध करून देणे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक करण्यास मदत करणे आणि महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, कर्ज सुविधा, डिजिटल साक्षरता देणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच व्यवसाय प्रशिक्षण व कौशल्यविकास, बँक कर्ज व आर्थिक पाठबळ, डिजिटल नोंदणी व व्यवहार, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी आणि कंपन्यांची स्थापना असे लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळतात.
लखपती दीदी योजना ही केवळ महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणारी योजना नसून, ग्रामीण भागातील कुटुंबांची जीवनशैली बदलणारी शक्ती आहे. प्रशासनाच्या आणि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ठाणे जिल्ह्यात लखपती दीदी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात यश मिळाले आहे.” रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे
ठाणे जिल्ह्यातील लखपती दीदी उद्दिष्टपूर्ती | तालुका बचत गट उद्दिष्टपूर्ती |
अंबरनाथ ७९८ | ३०९५ ३४६५ |
कल्याण १६२७ | ६२६९ ६६२९ |
मुरबाड २२९४ | ७९४० ७९४० |
भिवंडी ३१५१ | ११२२० १२८६६ |
शहापूर २९५९ | १७३२० १७८९३ |