ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ अंतर्गत औषधी आणि पोषणमूल्यांनी भरलेल्या रानभाज्यांचा अनोखा महोत्सव बीजे हायस्कूलच्या परिसरात भरविण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत झाले, यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
काही दिवसांपूर्वी आदिवासी पाड्यांतील समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सुमारे १० किमी पायपीट करत भर पावसात शहापूर तालुक्यातील दापुरमाळ या आदिवासी पाड्याची पाहणी केल्याची चर्चा रंगली असतानाच, बीजे हायस्कूलच्या आवारात भरविण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात घुगे यांनी रानभाज्यांचा आस्वाद घेतला.
ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ अंतर्गत औषधी आणि गुणकारी रानभाज्यांचा महोत्सव भरविण्यात आला आहे. यंदा या महोत्सवाचे तिसरे वर्षे आहे. या महोत्सवात शहापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील महिला बचत गटाच्या १०० हून अधिक महिला या रानभाज्या महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनात दहा ते वीस स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलवर आघाडा, शेवाळा, भाऱंग, मायाळू, ढेंढ भाजी, करटोली, टाकळा अशा अनेक औषधी आणि पोषक रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून या रानभाज्यांची विक्री होत आहे.
या रानभाज्या महोत्सवाचे उद्घटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी एका स्टॉलवर घावणे आणि ऋषीपंचमीसाठी करण्यात येणारी भाजी तसेच औषधी कारल्याची भाजी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी सीईओंनी घावणा आणि या रानभाजीचा आस्वाद घेतला. तसेच रानभाज्या औषधी दृष्टीकोनातून कशा महत्वाच्या आहेत याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. या महोत्सवात रानभाज्यांसह नाचणीचे मोदक, ड्रायफ्रुट, शेवग्याचा पानांचा सूप, ब्राऊन राईस असे विविध पदार्थ ठेवण्यात आले आहेत. एक दिवसीय भरलेल्या या रानभाज्या महोत्सवात दुपारपर्यंत सर्वाधिक भाज्यांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.