टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणूकीचा फटका सोमवारी ठाणे शहराला बसला. ठाण्यातील कोर्टनाका ते ऐरोली येथील पटनी मैदानापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. वाहन चालकांना अवघ्या पाच मिनीटाच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास लागत होता. वाहतूक कोंडीमध्ये अनेक बसगाड्या, रुग्णवाहिकाही अडकून आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

टेंभीनाका येथे शिवसेनेकडून टेंभीनाका चौकात नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. उत्सवासाठी कळवा येथील एका कारखान्यातून देवीची मुर्ती आणली जाते. त्यामुळे कळवा ते टेंभीनाका अशी देवीची आगमन मिरवणूक काढली जाते. सोमवारी दुपारी १२.३० ही आगमन मिरवणूक सुरू झाली. या मिरवणूकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार, पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला. त्याचा फटका ठाणेकरांना बसला. सोमवारी दुपारी कोर्टनाका ते ऐरोली येथील पटनी मैदान आणि खारेगाव येथील सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळेपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहन चालकांच्या नाकी नऊ आले आहेत.