डोंबिवली एमआयडीसीतील बंद असलेल्या एका बंगल्याच्या खिडकीच्या जाळ्या लोखंडी कटावणीने वाकवून घरात प्रवेश करुन चोरट्याने घरातील १६ लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिन्यांचा ऐवज गुरुवारी रात्री चोरुन नेला. एमआयडीसी हद्दीत अनेक दिवसांपासून बंद असलेल्या चोऱ्या पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा – कल्याण : गणेशोत्सवात मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना

पोलिसांनी सांगितले, प्रजना राय शेट्टी (रा. आरएल १११, मिलापनगर, यश बंगला, एमआयडीसी, डोंबिवली) येथे राहतात. प्रजना या सिटी रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्या कामावर गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीच्या जाळ्या धारदार कटावणीने वाकविल्या. तेथून घरात प्रवेश केला. किमती ऐवज, पैशांसाठी घरातील सामानाची फेकाफेक केली. तेथे काही आढळले नाही म्हणून चोरट्याने तक्रारदार प्रजना यांची मुलगी सलोनी हिच्या शय्यागृहातील लाकडी कपाटातील कुलुपबंद खणात ठेवलेले सोने, हिऱ्याचे १६ लाख रुपये किमतीचे हिरे, सोन्याचे दागिने चोरुन नेले.

हेही वाचा – कळव्यात रविवारी रेल्वे प्रवाशांच्या बैठकीचे आयोजन ; वातानुकूलीत लोकल आणि इतर समस्यांबाबत होणार चर्चा

प्रजना शेट्टी गुरुवारी सकाळी घरी आल्या त्यावेळी त्यांना घराच्या पाठीमागील खिडकी तोडलेली दिसली. घरात सामानाची फेकाफेक, कपाट उघडे असल्याचे दिसले. घरातील किमती ऐवज चोरीला गेल्याने प्रजना शेट्टी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

एमआयडीसी भागात नियमित चोऱ्या होतात. निवासी विभागातील चोऱ्या गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांनी गस्त वाढविल्याने बंद झाल्या होत्या. या चोऱ्या पुन्हा वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एमआयडीसीच्या अनेक भागातील रस्त्यांवर पथदिवे चालू नाहीत. ते चालू करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.