उल्हासनगर : आगरी समाजाच्या समृद्ध परंपरा, बोलीभाषा, साहित्य आणि संस्कृतीचा एकत्रित उत्सव ठरणारे तिसरे आगरी साहित्य संमेलन यंदा मलंगगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात होणार आहे. आगरी ग्रंथालय चळवळ आणि समाज कल्याण न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन रविवार, १७ ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील असून, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोककवी अरुण म्हात्रे संमेलनाध्यक्ष म्हणून असणार आहेत.

सकाळी ग्रंथदिंडी, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने या संमेलनाची औपचारिक सुरुवात होईल. उद्घाटनानंतर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या प्रवचनातून आगरी बोलीचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.

यानंतर आगरी कथा अभिवाचनाचे सत्र रंगणार असून अनेक कथाकार आपली लेखनकृती सादर करतील. सकाळी साडेअकरा वाजता ‘आन-मान’ या विषयावर आधारित लघुनाटिका सादर केली जाईल. दुपारी बारा वाजता आगरी कवी संमेलन रंगणार असून, विविध कवींनी रचलेल्या कवितांतून आगरी संस्कृती व समाजजीवनाचे दर्शन घडणार आहे. दुपारच्या जेवणानंतर श्रीमलंग जागरण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडतील. त्यानंतर आगऱ्यांच्या शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान होईल. अॅड. विवेक भोपी आपल्या प्रभावी भाषणातून समाजाच्या पराक्रमाच्या परंपरा उपस्थितांपुढे मांडतील.

दुपारनंतर सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारे चर्चासत्र होणार आहे. त्यात अनेक मान्यवर सहभागी होणार असून, आगरी समाजासमोरील विविध आव्हाने व त्यावरील उपाय यावर विचारमंथन होईल. त्यानंतर पारंपरिक फेऱ्यांची गाणी रसिकांसमोर सादर केली जातील, तर लोककलाकार काशिनाथ चिंचेय यांच्या गीतांचा ठेवा ‘स्मृतीस उजाळा’ या विशेष सत्रातून जपला जाणार आहे. संध्याकाळी मान्यवरांचे मनोगत घेण्यात येईल आणि अखेरीस लोककवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षीय भाषणाने या संमेलनाचा समारोप होणार आहे.

या संमेलनात आगरी समाजातील साहित्यिक, कलाकार, संशोधक आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. समाजातील परंपरा, संस्कृती आणि बोलीभाषेचे जतन व संवर्धन घडविण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.