लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर गंधार बालकलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे.

यंदा गंधार गौरव पुरस्काराचे हे आठवे वर्षे आहे. गंधार बालनाट्य संस्थेतर्फे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. यंदाचा पुरस्कार महेश कोठारे यांना देण्यात येणार आहे. ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कोठारे यांना पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या वर्षांपासून गंधार बालकलाकार पुरस्कार देण्यात येणार असून पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशिष शेलार उपस्थित असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कल्याणमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे

मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी राजेश भोसले आणि हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष असताना महेश कोठारे यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी केली. त्यांनी अभिनय क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ घालवला. त्यांना अद्याप पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नाही, याची खंत वाटते. गंधार गौरव पुरस्कारामुळे त्यांना नक्कीच पद्मश्री मिळेल, अशी प्रतिक्रिया अभिनेते विजय पाटकर यांनी व्यक्त केली.