ठाणे : आरटीई अंतर्गत निवड झालेले विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पालक जेव्हा शाळेत प्रवेश घेण्यास जात आहेत. तेव्हा शाळा प्रशासनाकडून पालकांकडे शाळेतील इतर उपक्रमांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात आहे. हे पैसे भरले नाही तर, शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असे पालकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून त्यांनी शिक्षणअधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. यावर शिक्षण विभाग कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई शहरातील आरटीई प्रवेशित बालकांचे पालक एकत्रित येत त्यांनी नवी मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

शैक्षणिक वर्षे २०२४ -२५ या वर्षाची आरटीई कायद्याअंतर्गत होणाऱ्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यातून आरटीईसाठी ६४३ शाळा पात्र झाल्या असून ११ हजार ३३९ जागांसाठी ही प्रक्रिया पार पडत आहे. या जागांसाठी ठाणे जिल्ह्यातून विविध भागातून १९ हजार ५६८ अर्ज प्राप्त झाले होते. यातून पहिल्या यादीत ९ हजार ५९७ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरु आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर ज्या शाळेत आपल्या पाल्याची निवड झाली आहे, त्या शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक जाताच, त्यांच्याकडे क्रीडा, नृत्य, गायन, साहसी खेळ, सहल अशा विविध उपक्रमांची एकत्रित शुल्क भरण्यास सक्ती केली जात आहे. या उपक्रमांसाठी ठाणे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये १० हजार तर, काही शाळांमध्ये १५ ते २० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. शिवाय पालकांनी हे शुल्क भरल्यानंतर त्यांना कोणतीही पावती दिली जात नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. तसेच हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारले जात नसून रोख रक्कम भरण्यास पालकांना सांगितले जात आहे. त्यामुळे या खासगी शाळा बेकायदेशिर रित्या आरटीईच्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकाळत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

आणखी वाचा-घोडबंदर परिसराला होतोय अपुरा पाणी पुरवठा

शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा फक्त कागदावरच मोफत राहिला आहे. आरटीईमध्ये विद्यार्थ्यांची निवड होऊन सुद्धा शाळांचा मनमानी कारभार सुरु आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत इतर उपक्रमाच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळण्याचे काम सुरु आहे. अशा मुजोर शाळांची प्रशासनाने मान्यता रद्द केली पाहिजे -प्रकाश दिलपाक, शिक्षण आरोग्य अधिकार मंच, नवी मुंबई

पालक प्रतिक्रिया

मी दिव्यांग असून माझे वार्षिक उत्पन्न १ लाखाहून कमी आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाचे शिक्षण आरटीई अंतर्गत पूर्ण करण्याचे ठरविले. त्याची आरटीई प्रक्रियेअंतर्गत शाळेत निवड झाली आहे. परंतू, शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेलो असताना, माझ्याकडून इतर उपक्रमांसाठी २५ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितले. शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावे. -सुबोध सांबरे, पालक, नवी मुंबई</strong>

आणखी वाचा-Thane crime news: उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून टपरी वाल्याची हत्या

आरटीई प्रक्रियेअंतर्गत नवी मुंबईतील एका शाळेत माझ्या मुलाची निवड झाली आहे. परंतू, या शाळेत इतर उपक्रमासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली जात आहे. यासंदर्भात, शिक्षण विभागाला तक्रार करुनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई शहरातील एका पालकांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत माझ्या मुलीची निवड झाली आहे. शाळेत मी प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलो. त्यावेळी मला इतर उपक्रमांसाठी १० हजार रुपये भरण्यास सांगितले. यामध्ये पुस्तकांचे, सहलीचे तसेच इतर उपक्रमांचा समावेश असेल असं शाळेकडून मला सांगण्यात आले. त्यांच्याकडे मी शुल्क दिल्यानंतर पावतीची विचारना केली असता, त्यांनी आम्ही पावती देत नाही असे सांगितले, अशी प्रतिक्रिया भिवंडीतील एका पालकाने दिली.