scorecardresearch

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जाधव यांच्या छायाचित्रावर फुल्ली मारत ‘तारिख गवा है, गुस्ताख कल भी ना बच पाया था.. आज भी ना बच पायेगा..’ अशा धमकीचे ध्वनी आणि चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित

avinash jadhav
मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी भाषणात माहिम येथील अनधिकृत दर्गाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर अविनाश जाधव यांनीही मुंब्रा शहरातील अनधिकृत दर्गा विषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर समाजमाध्यमावर अविनाश जाधव यांच्या छायाचित्रावर फुल्ली मारल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले असून त्यामध्ये धमकीचा संदेश असलेला ध्ननी आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : अपंगाच्या डब्यात प्रवाशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील भाषणात माहिम येथील अनधिकृत दर्गा विषयी मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा येथील वन विभागाच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर अविनाश जाधव यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक चित्रीकरण आले. त्यामध्ये अविनाश जाधव यांच्या छायाचित्रावर फुल्ली मारण्यात आली होती. ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे… कोई गुस्ताख छुप नही पायेगा, हम उसे ढूंड-ढूंड कर मारेंगे… तारिख गवाह है, गुस्ताख कल भी ना बच पाया था, आज भी ना बच पायेगा, नभी सें….’ असा ध्ननी त्यामध्ये होता. दरम्यान, याप्रकरणी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 14:10 IST

संबंधित बातम्या