Metro trial run : ठाणे : ठाण्यात मेट्रोच्या चाचणीनंतर वाहतुक कोंडीची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या घोडबंदरच्या रहिवाशांना आज, मंगळवारी सकाळी वाहतुक कोंडीचा जाच सहन करावा लागला. घोडबंदर घाटात तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून यातील दोन घटनांमध्ये वाहने बंद पडली. तर एकामध्ये अवजड वाहनातील साहित्य रस्त्यावर पडले. या घटनांमुळे घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून त्याचा परिणाम मिरा भाईंदर, वसई-विरार येथून ठाण्यात वाहतुक करणाऱ्या आणि ठाण्याहून तेथे जाणाऱ्या चालकांना सहन करावा लागत आहे.

घोडबंदर मार्गावर सोमवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाच्या मेट्रो सेवेची चाचणी घोडबंदर येथील चार स्थानकांवर करण्यात आली. या चाचणीनंतर घोडबंदर भागातील रहिवाशी आता कोंडीतून सुटका होईल याचा विचार करू लागले आहेत. मेट्रोची चाचणी झाली असली तरीही हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्ष लागणार आहेत.

कोंडीचे घोडबंदर

ठाण्यातील नोकरदारांना मुंबई गाठता यावी यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो चार आणि चार अ प्रकल्पाची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पांची कामे सध्या घोडबंदर भागातून सुरु आहे. घोडबंदर भागात पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली वाईट अवस्था यामुळे घोडबंदर भागातून प्रवास करणाऱ्यांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. तासन्-तास वाहन चालक कोंडीत अडकून असतात. ठाण्यातील वाहतुक कोंडीचा थेट परिणाम ठाणे, मिरा भाईंदर, वसई आणि भिवंडी या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये बसतो. वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक, मनसेने आंदोलनही केले. परंतु कोंडी सुटली नाही.

तीन अपघात अन् कोंडी

आज, मंगळवारी मध्यरात्री आणि पहाटे अवघ्या नऊ तासाच्या अंतरावर घोडबंदर येथील गायमुख घाट आणि परिसरात तीन अपघात झाले. यातील एक घटना मिरा भाईंदर पोलिसांच्या हद्दीतील काशिमीरा भागात उघड झाली. मध्यरात्री १.२५ च्या सुमारास ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या ट्रेलरमधून १८ टनाचे लोखंडी साहित्य रस्त्यावर पडले. त्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला.

सुमारे दोन तासानंतर हा अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्यामधून बाजूला करण्यास शक्य झाले. दुसऱ्या घटनेत ८५ टन अवजड वाहन गायमुख घाटामध्ये बंद पडले. तर तिसरी घटना सकाळी ८ वाजता गायमुख घाटात घडली. रस्त्याच्या मधोमध जड वाहन बंद पडल्याने कोंडी झाली.