ठाणे : पाच वर्षांपुर्वी सर्वत्र थैमान घातलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या तीन वर्षांपुर्वी आटोक्यात येऊन रुग्ण संख्या शुन्यावर आल्याचे चित्र असतानाच, ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे तीन रुग्ण गेल्या दोन दिवसांत आढळून आल्याने आरोग्य विभाग सर्तक झाला आहे. या रुग्णांसाठी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १९ खांटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे.
पाच वर्षांपुर्वी म्हणजेच २०२० मध्ये संपुर्ण जगभरात करोना विषाणूचा उद्रेक झाला होता. देशासह राज्यात आणि ठाण्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत होती. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध होत नव्हत्या. करोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यु झाला होता. या विषाणूमुळे सर्वांच्या मनात धडकी भरवली होती. संपुर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात अनेकांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम झाला. तीन वर्षांपुर्वी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि करोना रुग्ण संख्या शुन्यावर येऊन परिस्थिती रुळावर आली. यानंतर शहरातील जनजीवन पुन्हा पुर्वपदावर येऊन सुरळीतपणे सुरू असतानाच, दोन वर्षानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे तीन रुग्ण गेल्या दोन दिवसांत आढळून आले आहेत. या तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत. असे असले तरी अचानकपणे तीन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सर्तक झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे तीन रुग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. हे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रात करोना संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णांनाही अशी चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याची सुचना देण्यात आली आहे. पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १९ खांटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यात १५ प्राणवायुच्या तर, ४ साध्या खाटा आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.