ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर दुचाकीवर निघालेल्या तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. विशाल झुगरे, गणेश झुगरे आणि प्रकाश कवटे अशी मृतांची नावे आहेत. या अपघाता प्रकरणी भरधाव दुचाकी चालविल्याने गणेश याच्याविरोधात कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई नाशिक महामार्ग या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात तीन मित्रांना जीव गमवावा लागला आहे. या तिन्ही मित्रांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा कसा बसले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

शहापूर तालुक्यातील कसारा येथील लतिफवाडी परिसरात गणेश, विशाल आणि प्रकाश हे राहत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी ते एकाच दुचाकीवरून मुंबई नाशिक महामार्गावरील वशाळा पूल येथे जात होते. गणेश झुगरे हे दुचाकी चालवित होते. दरम्यान, वशाळा येथे पुलाचे काम सुरु असल्याने याठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते. या अडथळ्याला त्यांची दुचाकी धडकली. त्यामुळे तिघेही दुचाकीवरून खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तिघांवर काळाचा घात…

घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर ते प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले. परंतु तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपारासाठी इतर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील डाॅक्टरांनी दिला. तिघांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. गणेश हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर विशाल आणि प्रकाश यांना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

घोटी रुग्णालयात गणेश यांना डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर विशाल यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. प्रकाश यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी त्यांचाही मृत्यू झाला. गणेश यांनी भरधाव दुचाकी चालविल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, कसारा पोलीस ठाण्यात गणेश यांच्याविरोधात मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब), २८२ प्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल झाला आहे.