ठाणे : दिवाळीत पार्टी दिली नाही म्हणून एका तरुणाची तीन जणांनी कोयत्याने वार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुकेश चौबे (३५) असे जखमी व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तिघांविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी दोन जण सराईत असल्याचे कळते आहे.निलेश, निखील आणि अन्नु अशी गुन्हा दाखल असलेल्यांची नावे आहेत. भिवंडी येथील कामतघर भागात मुकेश चौबे हे त्यांच्या वृद्ध आई सोबत राहतात. त्यांचा रंगकामाचा व्यवसाय आहे.
२२ ऑक्टोबरला मुकेश हे परिसरातून जात असताना त्यांच्या ओळखीचे तिघेजण त्यांच्या दिशेने आले. त्यापैकी निलेश नावाच्या एका तरुणाने मुकेश यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ‘भाई दिवाली का पार्टी कब देगा’ असे म्हणत मुकेश यांच्याकडे पार्टीची मागणी केली. मुकेश यांनी त्यास ‘दिवाली खत्म हो गई, अब पैसा कहाँ बाकी पार्टी के लिए’ असे म्हणाले. त्यावेळी ‘तुझ्या गळ्यातील सोन्याची साखळी विक आणि पार्टी दे’ असे निखिल त्याला म्हणाला.
जेल मेरे घर जैसा है…
मुकेश त्यांच्यासोबत संभाषण करत असताना, त्याला एक काॅल आला. त्या काॅलवर बोलताना अचानक निखिल याने मुकेश यांच्या मानेजवळ हाताने फटका मारला. याचा जाब मुकेश यांनी विचारला असता, ‘तु पार्टी कैसे नही देगा मै देखता हूँ, तु मुझे जानता नहीं क्या, अभी जेल से छुटकर बाहर आया हूँ, जेल मेरे घर जैसा है’ असे निखिल त्याला म्हणाला. मुकेश यांनी पैसे नसल्याचे म्हणताच अन्नु याने मुकेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर निखिल याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यानंतर निलेश याने मुकेश यांचे हात पकडले.
निखिल याच्याकडे एक कोयता होता. मुकेश प्रतिकार करत असतानाच, त्यांच्या डोक्यात त्याने कोयत्याचा वार केला. तर अन्नु याने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. परिसरातील नागरिक मुकेश यांना वाचविण्यासाठी येत असताना निखिल याने त्यांनाही कोयत्याचा धाक दाखविला. त्यामुळे नागरिक तेथून निघून जाऊ लागले. दुकानदारांनी देखील त्यांची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. परंतु काही नागरिकांनी समयसूचकता दाखवित मुकेश यांना नारपोली पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी मुकेश यांना भिवंडीतील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात नेण्यात आले. मुकेश हे घरी आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. त्यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तिघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
