कल्याण – मंगळवारी रात्री अचानक तुफान धुळीचे वादळ आणि पाऊस सुरू असताना कल्याण पूर्वेत चिंचपाडा भागात रस्त्याच्या कडेचे एक भलेमोठे झाड एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षेवर कोसळले. अचानक रिक्षेवर कोसळलेल्या झाडाने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला आहे.

एक महिला आणि दोन पुरूष प्रवासी यांचा मृत्यांमध्ये समावेश आहे. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाकडून प्रवासी घेऊन एक रिक्षा चालक चिंचपाडा भागात चालला होता. याचवेळी अचानक तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या वाऱ्याच्या वेगाने चिंचपाडा भागातील रस्त्याच्याकडेला असलेले एक गुलमोहराचे झाड तेथून जात असलेल्या रिक्षेवर अचानक कोसळले. झाडाचा बुंधा, फांद्या रिक्षेच्या छतावर अचानक मोठ्या झटक्याने कोसळल्याने रिक्षेचा सांगाड्यासह आतील प्रवासी झाडाच्या माऱ्याने दबले गेले.

वादळी वारा पावसामुळे अनेक नागरिक सुरक्षिततेसाठी दुकाने, इमारतींच्या आडोशाला उभे होते. त्यांनी तातडीने जखमींना पालिकेच्या रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी तपासणी करून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मृत प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. पालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

रस्त्यावर झाड कोसळल्याने ते बाजुला करण्याचे काम सुरू केले. या कालावधीत चिंचपाडा रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने अडकून पडल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली. माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचून या भागातील वाहतूक कोंडी सोडविणे, जखमींना तातडीने रुग्णालयात पोहचविण्यासाठी साहाय्य केले. झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचा झाड कोसळून मृत्यू झाल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.