डोंबिवली – जूनमध्ये दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीसाठी स्थलांतरित पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात आलेले श्रीलंका, भूतान परिसरातील तिबोटी खंड्या पक्षी पाऊस कमी झाला की ऑगस्ट अखेरपर्यंत परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात. डोंबिवली जवळील शिळफाटा भागातील गणपती मंदिर खिंडीजवळ या पक्ष्यांचा अधिवास असतो.
परतीच्या प्रवासाला असलेला तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या साखळीतील एक पक्षी दमून शनिवारी सकाळी डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागातील पीपी चेंबर्स माॅल भागात एका इमारतीच्या गच्चीवर बसला. तेथे त्याला बाहेरून आलेल्या या पक्ष्याला कावळ्यांनी आपल्या हद्दीत प्रवेश केला म्हणून टोचकून, कावकाव करून घाबरून सोडले.
अचानक पीपी चेंबर्स इमारत परिसरात एकावेळी अनेक कावळे इमारतीच्या गच्चीवर मोठ्याने कावकाव करून गलका का करत आहेत म्हणून काही नागरिकांनी इमारतीच्या गच्चीवर जाऊन पाहिले. तेथे एक रंगीबेरंगी पाहुणा पक्षी कावळ्यांच्या गराड्यात अडकला होतो. तो भेदरला होता. कावळे त्याला उडून देण्यास तयार नव्हते. हा बाहेरचा पक्षी असावा आणि कावळे त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असल्याने काही प्राणी प्रेमींनी ‘प्लान्ट फाॅर अनिमल वेल्फेअर सोसायटी’चे संस्थापक संचालक नीलेश भणगे यांना संपर्क केला.
संचालक भणगे यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीप्रमाणे आपल्या संस्थेचे ऋषिकेश सुरसे, ओंकार साळुंखे यांना पीपी चेंबर्स माॅल भागात पाठविले. त्यांनी गच्चीवर जाऊन पाहिले तर कावळ्यांच्या गराड्यात एक रंंगीबेरंगी पक्षी अडकला आहे. तो भेदरला आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांनी पक्ष्याला पाॅजच्या डोंबिवलीतील कार्यालयात आणले. नीलेश भणगे आणि सहकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याला कोठेही कावळ्यांनी टोचकले नव्हते. तो कावळ्यांनी चारही बाजुने घेरल्याने घाबरलेला होता, असे निदर्शनास आले.
तिबोटी खंड्या म्हणून ओळखला जाणारा हे पक्षी समुहाने श्रीलंका, भूतान मधून जूनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात प्रजननासाठी महाराष्ट्राच्या विविध भागात येतात.कोकण किनारपट्टी भागात तो आढळतो. डोंबिवलीजवळ या पक्ष्यांचा अधिवास शिळफाटा चौकातील (दत्तमंदिर) महापे रस्त्यावरील खिंडीतील गणपती मंदिर टेकडीवरील नीलगिरींची वनराई असलेल्या भागात असतो. तो आपली घरटी डोंगर कड्यावरील भुसभुशीत मातीत, पाणी असलेल्या भागात करतात. ही घरटी एक मीटर लांबीची असतात. त्यांचे घरटे बांधण्याचा प्रकार कौतुकास्पद असतो. तेथे ते तीन ते चार पिल्लांना जन्म देतात. ऑगस्टपर्यंत पिल्ले मोठी झाली की पिल्लांना घेऊन पुन्हा ऑगस्ट अखेरपासून श्रीलंका, भूतान असा परतीचा प्रवास सुरू करतात, अशी माहिती नीलेश भणगे यांनी दिली.
प्रणयाची चाहूल लागली की तिबोटी खंड्या मादीला मनविण्यासाठी तिला सरडे, खेकडे, कोळी, चौपई असे सरपटणारे प्राणी खाऊ घालतो. त्यानंतर ते घरट्यांमध्ये विणीच्या मोसमात पिलांना जन्म देतात. वीस दिवसात पिले घरट्याबाहेर येऊन आई सोबत शिकारीला बाहेर पडतात. पाणी आणि भुसभुशीत जमीन ही त्यांची अधिवासाची ठिकाणे असतात. पाल, खेकडे, कोळी, बेडूक, सापसुरळी हे तिबोटी खंड्याचे आवडते खाद्य आहे. २०२० मध्ये रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून तिबोटी खंड्याला जाहीर करण्यात आले आहे. पक्षीप्रेमींचे हा पक्षी विशेष आकर्षण आहे, असे भणगे यांनी सांगितले.