ठाणे : मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याला तुतारी एक्स्प्रेसने घेऊन जाणाऱ्या अमोल उदलकर (४२) याला बुधवारी ठाणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहृत बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याला डोंबिवली येथील जननी आशिष संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. तर आरोपीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.
मुंबई येथील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहण झाले असून एक व्यक्ती त्या मुलाला तुतारी एक्स्प्रेसने घेऊन जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून ठाणे रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मध्यरात्री १२.४५ वाजता ठाणे रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस पथकाला एक्स्प्रेसच्या एका डब्यामध्ये अपहृत मुलगा हा अमोल उदलकर याच्यासोबत आढळून आला.
पोलिसांनी अमोल उदलकर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, तो सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड भागातील रहिवासी असल्याचे उघड झाले. या अहरहणाप्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडे सोपविले. तर उदलकर याला पुढील तपासासाठी भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर, मध्य परिमंडळाच्या उपायुक्त प्रज्ञा जेडगे, कल्याण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक चिमाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोपाळ, प्रमोद देशमुख, साहाय्यक उपनिरीक्षक धुमाळे, ताजने, महिला पोलीस हवालदार गोपाळ, महिला पोलीस शिपाई टिचकुले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.
