ठाणे : ठाण्यात दिवाळी पहाट निमित्ताने राम मारूती रोड, मासुंदा तलाव परिसर, नौपाडा भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमानिमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुलुंड भागातून हजारो तरुण- तरुणी गर्दी करत असतात. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. उद्या, २० ऑक्टोबरला सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील.

ठाण्यात दिवाळी निमित्ताने दरवर्षी दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित केला जातो. दोन्ही शिवसेना, भाजपकडून विविध संस्थेच्या माध्यमातून मासुंदा तलाव, राम मारूत रोड परिसरात मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम आयोजित केले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षातील नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील येथे उपस्थित असतात.

ध्वनीक्षेपकावर गाणी वाजवून येथे उत्सव साजरा होत असल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून हजारो तरुण-तरुण दिवाळी पहाट निमित्ताने येत असतात. या कालावधीत मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील २० ऑक्टोबरला दिवाळी पहाट निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत.

वाहतुक बदल असे आहेत

– डाॅ. मूस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मूस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टाॅवरनाका, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.

– गडकरी चौक येथून डाॅ. मूस चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अल्मेडा चौक, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास मार्गे वाहतुक करतील.

– घंटाळी मंदिर चौक येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना घंटाळी मंदिर जवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने घंटाळी मंदिर येथून घंटाळी पथ मार्गे वाहतुक करतील.

– गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंप या मार्गावरील काका सोहनी पथ येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक मार्गे किंवा घंटाळी मंदिर मार्गे वाहतुक करतील.

– राजमाता वडापाव सेंटर दुकान येथून गजानन महाराज चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव सेंटर दुकानाजवळ प्रवेशंबदी असून येथील वाहने सेंटरजवळून गोखले रोड मार्गे वाहतुक करु शकतील.