ठाणे : नारळी पौर्णिमेनिमित्ताने करण्यात आलेल्या वाहतुक बदलाचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुक व्यवस्थेवर बसला. शुक्रवारी रात्री कळवा ते नवी मुंबईतील दिघा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग, कळवा शहरातील अंतर्गत मार्गावरही वाहनांचा भार वाढून वाहतुक कोंडी झाली होती.
कळवा खाडी पूल येथे दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ठाण्यातील विविध भागातून नागरिक या उत्सवासाठी खाडी पूल येथे जमत असतात. त्यामुळे या भागाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी कळवा खाडी पूल, कोर्टनाका, साकेत परिसरात वाहतुक बदल लागू केले होते.
शुक्रवारी रात्री वाहतुक बदलाचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुक व्यवस्थेवर झाला. कळवा नाका ते नवी मुंबईतील दिघा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे ठाणे बेलापूर मार्गे नवी मुंबई येथून ठाणे शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.
या मार्गावर कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी पूर्व द्रुतगती महामार्गाने ठाणे शहर गाठण्याचा निर्णय घेतला. परंतु पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी पाऊस पडल्याने तसेच इतर अंतर्गत मार्गांवर वाहनांचा भार वाढल्याने अंतर्गत मार्गांवरही वाहतुक कोंडी झाली होती.