Traffic Jam in MMR: महामुंबई परिसरात दिवसा मुख्य मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक व्हावी की नाही, यासंबंधी राज्यातील महायुती सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्र्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या मतांचा फटका हजारो नियमित प्रवाशांना बसू लागला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत अवजड वाहनांना पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश देण्याचा आदेश दिला होता. मात्र, या निर्णयाचा उद्योगांना फटका बसत असल्याने सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत अवजड वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी न झाल्याने आयुक्तालय हद्दीत अवजड वाहनांच्या रांगा मुख्य मार्गांवर लागल्या. त्यामुळे, ठाणे, पालघर, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवलीला अजस्र वाहतुकीचा विळखा बसल्याचे चित्र आहे.

गुजरातेतून उरणच्या तालुक्यातील ‘जेएनपीए’ तसेच भिवंडीतील गोदामात मालवाहतूक वाहनांची ये-जा सुरू असते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेएनपीए’ बंदरातून भिवंडी, आमणे, अंजुर, वाडा, मानकोलीतील गोदामांच्या परिसरात येणारी अवजड वाहने गेले काही दिवस अत्यंत बेशिस्त पद्धतीने उभी केली जात आहेत. त्यामुळे महामुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे.

तीन दिवसांपूर्वी मुंबई-अहमदाबाद मार्गावर वर्सोवा पुलापासून वसई विरारच्या पलीकडे ३० ते ३५ किमी अंतरापर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा कोंडीचा भार पुढे घोडबंदर मार्गावरही दिसून आला. सायंकाळच्या वेळेतही अवजड वाहने महामार्गावर दिसू लागली आहेत. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंद नगर टोलनाक्यापासून घोडबंदर पर्यंतचा मार्ग दररोज कोंडीत सापडू लागला आहे. एरवी २० ते २५ मिनीटांच्या प्रवासासाठी सायंकाळी मुंबईतून घरी परतणाऱ्या ठाणेकरांना सव्वा ते दीड तासांचा अवधी लागत आहे.

जेएनपीए बंदरातून भिवंडीच्या दिशेने निघणारी काही अवजड वाहने मुंब्रा वळण रस्त्यावर तर काही वाहनांचा भार ठाणे बेलापूर मार्गावरही मार्गावर असतो. त्यामुळे ठाणे नवी मुंबई प्रवासासाठी ठाणे ते नवी मुंबई प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण शीळफाटा, तळोजा शीळफाटा, मुंब्रा बाह्यवळण, खारेगाव टोलनाका तेथून मुंबई नाशिक महामार्ग, काटई ते बदलापूर, अंबरनाथ वाहतूक कोंडीत अडकत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ ते पहाटे ५ यावेळेत अवजड वाहने सोडण्याचे आदेश दिले. या आदेशाचा फटका उद्योग जगताला बसू लागला. महामार्गांच्या दोन्ही बाजूला अवजड वाहनांच्या रांगा दिसू लागल्या. जेएनपीए बंदरातील कंटेनर हाताळणीही रखडू लागली. उद्योग जगतातील तक्रारी वाढू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयात हस्तक्षेप केला, असे बोलले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी द्या असे ठरले. जिल्हाप्रशासनाने तसा आदेशही काढला. आता या आदेशाचीही पायमल्ली होऊ लागली आहे. दिवसा रात्री कधीही अवजड वाहने कोणत्याही मार्गावर शिरकाव करू लागली आहेत. या वाहनांना रोखले तर अडचण आणि सोडले तर खोळंबा अशा द्विधा परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि पोलीस सापडले आहेत.

तीन दिवसांत निर्णय मागे

गणेशोत्सव वा त्यापूर्वीच्या कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर ठाणे, पालघर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रमुखांसोबत बैठक घेत होते. त्यांनी रस्त्यांची पाहणीही केली होती. सप्टेंबरमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात अवजड वाहनांना रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेतच परवानगी असेल, असा निर्णय घेतला होता. अवघ्या तीन दिवसांत शिंदे यांचा हा निर्णय मागे घ्यावा लागला.

वाहतूक कोंडीत अवजड वाहने

जिल्ह्यात ट्रक टर्मिनस उभारण्याची मागणी गेली तीन वर्षे केली जात आहे. परंतु ट्रक टर्मिनस नसल्याने अवजड वाहनांना प्रवेशबंदीच्या कालावधीत घोडबंदर येथील गायमुख, मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळील शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण रेतीबंदर यासह अनेक रस्त्यावर वाहने रोखली जातात. रस्त्यात अवजड वाहने उभी राहिल्याने मुख्य मार्गिकेवरील एक वाहिनी वाहतुकीसाठी बंद होते. त्याचा परिणाम मार्गावर होतो. अनेकदा वाहतूक कोंडी झाल्यास पोलिसांना येथील अवजड वाहनांना टप्प्याटप्प्याने शहरात प्रवेश दिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

दुरुस्तीचाही फटका

– घोडबंदर येथील घाट परिसरात काही दिवसांपूर्वीच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर ठाण्यातील गायमुख ते वसई पर्यंत वाहनांच्या रांगा लागत होते. अवघ्या एक ते दीड तासांच्या प्रवासासाठी वाहन चालकांना सुमारे पाच तास लागत होते.

– मुंबई नाशिक महामार्गावरही रस्ते रुंदीकरण प्रकल्पाची कामे सुरु असल्याने वाहतुक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतो.

अवजड वाहने प्रवेशबंदीच्या कालावधीत एका ठिकाणी उभे करता यावेत यासाठी ट्रक टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबई-नाशिक महामार्ग परिसरात काही जागांची पाहणी केली आहे. तसेच पालघर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांसोबतही ट्रक टर्मिनसच्या प्रस्तावाविषयी चर्चा सुरू आहे. – श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे.