कल्याण : कल्याण शहरात शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी चौकातून नारळी पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि पोहच रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले. यातच बैलबाजार भागात एक डम्पर रस्त्याच्या मध्येच उभा करण्यात आल्याने कोंडीत आणखी भर पडली. कल्याण शहर कोंडीने गजबजले असतानाच, कल्याण शीळ रस्ता मानपाडा, काटई ते पलावा चौक, खिडकाळीपर्यंत वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाला होता.

सणासुदीच्या काळात कल्याण शहर आणि मुख्य वर्दळीचा कल्याण शीळ रस्ता कोंडीने ठप्प झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. नारळी पौर्णिमा, त्यानंतर रक्षा बंधन आणि रविवार अशी पाठोपाठ तीन दिवस सलग सुट्टी आल्याने नागरिक अधिक संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. स्थानिक आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेली वाहने एकाचवेळी रस्त्यावर आली. या वाहनांचा भार कल्याणमधील अरूंद रस्ते पेलवू शकले नाहीत. त्यामुळे कल्याण शहरासह शीळ रस्ता वाहतूक कोंडीने गजबजून गेले.

कल्याण शहरात बाजार समिती ते शिवाजी चौक दरम्यान मेट्रोची कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे रस्त्याच्या दोन्ही मार्गिका अरूंद झाल्या आहेत. त्यात या भागात पदपथावर, रस्त्यावर फेरीवाले बसत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने या भागात रस्त्यावर उभी करून ठेवण्यात येतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. कल्याणमध्ये सहजानंद चौकात वाहतूक पोलिसांनी कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. हे नियोजन चुकल्याने त्याचा फटका शहरातील वाहतूक कोंडीतून बसत असल्याची टीका नागरिक करत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी चौक ते दुर्गाडी किल्ला दरम्यान नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी कोळी समाजाकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा आल्याने शिवाजी चौक ते लालचौकीकडे जाणारी वाहने कोंडीत अडकली. त्याचा फटका कल्याण रेल्वे स्थानक परिसराला बसला. शुक्रवारी संध्याकाळी कल्याण शहराचा अर्धा भाग वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

कल्याण शीळ रस्त्यावर एकाचवेळी अधिक संख्येने वाहने आली. त्यामुळे पलावा चौक, काटई निळजे उड्डाण पूल, काटई चौक आणि आजुबाजुचे पोहच रस्ते वाहनांनी गजबजून गेले होते. वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक होत होती. शीळ रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी पलावा चौकाजवळील रखडलेल्या पुलाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. काटई गावाजवळील वाहतूक पोलिसांची टपरी हटविण्यात यावी. याठिकाणी वाहतूक पोलीस वाहने तपासणीसाठी थांबवून वाहन चालकांना रोखून धरतात. त्याचा फटका निळजे पुलावरून येणाऱ्या प्रवाशांना बसत असल्याच्या तक्रारी आहेत.

कल्याण शहर, शीळ रस्ता दररोज वाहतूक कोंडीत अडकत असल्याने या वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी करत आहेत.