ghodbunder road : ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे खड्डे पडले आहे. या मार्गावरून मुंबई, गुजरात आणि नाशिककडे जाणाऱ्या अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. त्यातच गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसराचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून येथे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असतानाच, आता खड्डे, मास्टिक फुगवटे आणि उंच-सखल रस्त्यामुळे प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता महत्वाच्या मानला जातो. या मार्गावर अवजड तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी कामे सुरू असल्याने रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. या कामांमुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असला तरी, यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस सुरू आहे. या लांबलेल्या पावसामुळे रस्त्यावरचे बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत.यामुळे नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे.

जीव मुठीत घेऊन प्रवास

पातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा आणि माजीवाडा उड्डाणपुलांवर काही महिन्यांपूर्वी मास्टिक टाकून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र सततच्या पावसामुळे हे मास्टिक रस्ते उंच-सखल झाले आहेत. काही ठिकाणी फुगवट्यांमुळे गाड्या अक्षरशः बोटीप्रमाणे हेलकावे घेत वाहतूक करतात. यामुळे अवजड वाहन उलटून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांसाठी या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला आहे. तसेच दुचाकीस्वारांना तर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

बोटीतून प्रवास करण्यासारखा अनुभव

घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असतानाच, आता खड्डे, मास्टिक फुगवटे आणि उंच-सखल रस्त्यामुळे प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. याविरोधात नागरिकांकडून सोशल मीडियावर संबंधित प्राधिकरणाविरोधात टीका होत आहे. एकूणच, घोडबंदर मार्गावरील प्रवास हा आता बोटीतून प्रवास करण्यासारखा अनुभव देतो आहे. उंच-सखल रस्ता, मास्टिक फुगवटे आणि खड्डे या सगळ्यांमुळे “बापरे! गाडी की बोटीतून चाललोय काय?, अशी प्रतिक्रिया वाहनचालक आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.