ठाणे : मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जात आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाच्या कामामुळे मार्गिका अरुंद झाल्याने कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडत असतानाच, गुरुवारी एक ट्रक बंद पडल्याने पुन्हा कोंडी झाली. त्याचा फटका कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला.
नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ही वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. याशिवाय, या मार्गावरून दुपार आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. हा मार्ग मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जात आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाच्या कामामुळे मार्गिका अरुंद झाल्याने कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडीत भर पडत आहे. सातत्याने होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे.
अभिनेत्रीने व्यक्त केला होता संताप
मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत घोडबंदर रस्त्यावरील स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “मी आजही पाहते तेव्हाची परिस्थिती बदललेलीच नाही. रात्रभर शूटिंग करून आज सकाळी ५.३० वाजता घरी निघाले, तर घोडबंदर रस्त्यावर आधी ट्रॅफिक आणि मग हा सुंदर रस्ता… १२-१४ तासांचे शूट आणि त्यानंतर दोन तास असा प्रवास… हे नीट कधी होणार?” असा प्रश्न तिने उपस्थित केला होता.
मनसेही दिला होता इशारा
ठाणे शहरातील घोडबंदर भागात कोट्यवधी रुपयांची घरे खरेदी करुन वास्तव्यास आले, परंतु येथील खड्ड्यांचा जाच रहिवाशांपासून दूर जाताना दिसत नाही. घोडबंदर मार्गावरील प्रत्येक चौक, नाक्यावर खड्डे पडले आहेत. खड्डे भरणीनंतर पाऊस पडताच पुन्हा बुजवलेले खड्डे उखडतात. या खड्ड्यांत एखाद्या वाहन चालकाला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदरची अवस्था ‘खड्डेबंदर’ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते अविनाश जाधव यांनी या रस्त्याची पाहणी करत ” येत्या दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू” अशा शब्दात अधिकाऱ्यांना इशारा दिला होता.
ट्रक बंद पडल्याने कोंडी
घोडबंदरचा रस्ता ठाणे आणि मीरा भाईंदर अशा दोन पालिका क्षेत्रात विभागला गेला आहे. यातील मिरा भाईंदर पालिकेच्या हद्दीत गायमुख घाटातील निरा केंद्र येथे गुरुवारी सकाळी घोडबंदर ते ठाणे या वाहिनीवर मोठा ट्रक बंद पडला. यामुळे मार्गिकेवर कोंडी होताच चालकांनी बाजूच्या मार्गिकेवरून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गीकांवर वाहतूक कोंडी होऊन ओवळा सिग्नल पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीत सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची वाहन अडकली होती. पूलरने ट्रक खेचून घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत होते.