ठाणे : वसंत विहार येथील हिरानंदानी मेडोज भागात वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजिवडा येथील गोल्डन डायज नाका परिसरात सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई सचिन राठोड (३१) हे वाहतुकीचे नियमन करत होते. त्याचवेळी मुंबई नाशिक महामार्गावरून दोन मोटारी भरधाव जात असल्याची माहिती त्यांना नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली होती. त्यामुळे सचिन राठोड हे त्यांचे सहकारी दत्ताजी जाधव यांच्यासोबत रवी स्टील परिसरात गस्त घालून उभे होते. त्यावेळी एक मोटार त्यांना संशयास्पद आढळून आली. त्या मोटारीची मागील काच फुटली होती.

हेही वाचा >>> संगणकीय त्रुटींचा बदलापुरकरांना आर्थिक भूर्दंड? मुदतीपूर्वीच वाढीव मालमत्ता कराच्या बिलांचे वाटपाचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटारीमध्ये दोनजण होते. सचिन राठोड यांनी त्यांना मोटार रस्त्याकडेला उभी करण्यास सांगितली. परंतु त्यांनी मोटार भरधाव घोडबंदरच्या दिशेने नेण्यास सुरूवात केली. सचिन राठोड यांनी याबबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. तसेच त्यांनी दुचाकीवरून वाहतुक साहाय्यकासह मोटारीचा पाठलाग सुरू केला. संबंधित मोटार चालक हिरानंदानी मेडोज भागात गेला. तिथे वाहन थांबल्यानंतर सचिन आणि त्यांचे साथिदार दुचाकीवरून खाली उतरले. त्याचवेळी मोटारीतील वाहन चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्यांनी सचिन राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याला शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देत तेथून निघून गेले. याप्रकरणी सचिन राठोड यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.