scorecardresearch

ठाणे : रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचे सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण

महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षारक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.

Training of security guards Thane
ठाणे : रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचे सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षारक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गात रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण संवाद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच सरकारी कार्यालय असो की, रुग्णालय असो, कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे, याबाबतही प्रशिक्षण वर्गात सुरक्षारक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांसाठी नुकताच प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हाती रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते. त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती विचारल्यास किंवा एखाद्या तपासणीबाबत चौकशी केल्यास ते सांगण्यासही कर्तव्यावरील सुरक्षारक्षक मदत करतात. हीच जबाबदारी अधिक चोखपणे पार पडण्यासाठी नागरिकांशी सौजन्याने कसे बोलावे, त्यांच्याशी कसे वागावे, त्याचबरोबर रुग्णालयात कोणाचा गैरवावर सुरू असेल तर संबंधित व्यक्तीसोबत कशा पद्धतीचे वर्तन करावे याबाबत प्रशिक्षण वर्गात सुरक्षारक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णालयात सुरक्षारक्षकांच्या कामाची वेळ सत्रात असते. एक सत्र संपल्यानंतर दुसऱ्या सत्रासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत माहिती घेतली जाते. त्यात कर्मचारी गणवेषात आहे की नाही, तसेच त्याला कोणती कामे करावयाची आहे, या बाबतची माहिती अधिकाऱ्यांमार्फत दिली जाते. याबाबतही वरिष्ठांनी योग्य ती काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा – ठाण्यात महिलेची हत्या

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज तीन हजारहून अधिक रुग्ण हे विविध तपासण्यांसाठी येत असतात. तसेच त्यांच्यासोबत असणारे नातेवाईक असे मिळून साधारणपणे ४ ते ५ हजार नागरिकांची येथे नियमित वर्दळ असते. अशावेळी एखादा रुग्ण जर उपचारार्थ दाखल असेल तर त्याचे नातेवाईक हे रुग्णालयात वास्तव्यास असतात. आधीच आपल्या कुटुंबातील व्यक्ती दाखल असल्याने चितेंत असलेल्या नातेवाईकांनी एखाद्या सुरक्षा रक्षकास काही माहिती विचारली आणि सुरक्षा रक्षकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली तर नागरिकांची चिडचिड होते. त्यातून अनेकदा भांडणे देखील होतात. परिणामी एका व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीमुळे चिडलेले नागरिक हे संपूर्ण प्रशासनाला दोष देतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी फोर्सचे अधीक्षक रघुनाथ पालकर यांनी मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरातील आवारात रुग्ण्वाहिका सतत येत असतात. तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहनेदेखील पार्किंग केलेली असतात. पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना रुग्णालयाच्या आवारामध्ये वाहने उभी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे नागरिक आणि कर्तव्यावर असलेले सुरक्षारक्षक यांच्यात वादाचे प्रकार घडतात. अशी घटना घडल्यास त्यांच्याशी समजुतीने कसे वागावे, वाहने पार्क करण्याबद्दल त्यांच्याशी कसा संवाद सधावा, याबाबतही सुरक्षारक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेकदा नागरिकही सुरक्षारक्षकांशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांच्याशी वाद न वाढवता योग्य सल्ला देण्याबाबतच्या सूचना या मार्गदर्शन प्रशिक्षणात देण्यात आल्या.

हेही वाचा – भिवंडी पालिकेचा काँक्रीट रस्ते, पाणी, आरोग्य, वीज निर्मीतीचा संकल्प; अटल आनंद घन वन प्रकल्पांतर्गत शहरभर वृक्षांची लागवड

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या चारही मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात पुरुष जवानांची संख्या ७० तर महिला सुरक्षारक्षकांची संख्या ११ इतकी आहे. ज्या ठिकाणी महिला रुग्ण दाखल असतात, त्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रसुती कक्षाची सुरक्षादेखील महिला सुरक्षारक्षकांच्या हाती आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:08 IST

संबंधित बातम्या