कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाने मंगळवारपासून वृक्ष गणनेला प्रारंभ केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही गणना केली जाणार आहे. ५० वर्षाहून जुनाट असलेल्या वृक्षांची वारसा वृक्ष म्हणून गणना आणि अशा वृक्षांचे जतन केले जाणार आहे, अशी माहिती पालिका उद्यान विभागाचे अधीक्षक आणि सचिव संजय जाधव यांनी दिली.

पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण अधिनियम १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातर्फे ही गणना केली जाणार आहे. पालिकेच्या १२५ चौरस किलो मीटर क्षेत्रातील सार्वजनिक, खासगी, औद्योगिक क्षेत्र, मोकळ्या जागांवरील झाडांची गणना केली जाणार आहे. गणना करताना झाडांचा व्यास, त्याचे नाव, झाडाचे आयुर्मान, त्याचे वाढीचे ठिकाण अशा नोंदी केल्या जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करुन येत्या काळात पालिका हद्दीत कोणती ठिकाणे वृक्षारोपणासाठी, वनराई फुलविण्यासाठी योग्य आहेत अशा जागांची पाहणी वृक्ष गणनेच्या निमित्ताने केली जाणार आहे, असे अधीक्षक जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे: बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीतील मासेमारी आणि प्रवासी बोट वाहतूक बंद

येत्या १५ महिन्याच्या कालावधीत ही गणना पूर्ण होईल. साधारपणे सहा लाख झाडे गणनेत निश्चित होतील, असा प्रथामिक अंदाज काढण्यात आला आहे, असे अधीक्षक जाधव यांनी सांगितले. गणना करताना प्रत्येक कार्यकर्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल. त्याच्या जवळ मोबाईल उपयोजन असेल. संकलित केलेली माहिती गणक कार्यकर्ता मुख्य नियंत्रक विभागाला ऑनलाईन माध्यमातून देणार आहे. त्यामुळे वृक्ष गणना अचूक होण्यास साहाय्य होणार आहे.

२००७ मध्ये पालिकेने पालिका कर्मचारी, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी यांच्या साहाय्याने स्थळ पाहणी पध्दतीने वृक्ष गणना केली होती. त्यावेळी पालिका हद्दीत सुमारे तीन लाखाहून अधिक झाडे आढळून आली होती. रस्ता रुंदीकरण, विकास प्रकल्प राबविताना पालिका हद्दीत अनेक ठिकाणी झाडे तोडण्यात आली आहेत. अशा तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात पालिकेने कंपनी ठेकेदार, विकासक यांच्याकडून एका झाडामागे पाच झाडे लावून घेतली आहेत. आंबिवली टेकडीवर पालिकेने मागील तीन ते चार वर्षात वनराई प्रकल्प फुलविला आहे. नियमबाह्य झाडे तोडणाऱ्यांना प्रती झाड चार ते पाच हजार रुपये दंड आणि एका झाडामागे पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा दंडक घातला जातो, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत वृक्षगणना सुरू केली आहे. वर्षभराच्या कालावधीत ही गणना पूर्ण होईल. संकलित वृक्षांची माहिती महाविद्यालयात जैव, वनस्पती शास्त्र शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.”-संजय जाधव, अधीक्षक, उद्यान विभाग.