ठाणे : शहरातील जांभळी नाका बाजारपेठ परिसरात असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय जवळील एक झाड पडून दोन व्यक्ती जखमी झाल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. या दोन्ही व्यक्तींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.ठाण्यातील जांभळी नाका बाजारपेठ ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेत सकाळ-संध्याकाळ नागरिकांची रेलचेल सुरु असते.

रविवार म्हणजेच सुट्टीच्या दिवशी शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे यादिवशी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी होते. या बाजारपेठेत मराठी ग्रंथ संग्रहालयाची इमारत आहे. या इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. हे काम सुरु असताताना, इमारतीच्या बाहेर असलेले एक झाड अचानक पडले. या घटनेत संरक्षण भिंतीचे काम करणाऱ्या दिलीप गुप्ता (३५) आणि सुनील गौड (४८) हे दोन मजुर जखमी झाले. दिलीप यांच्या हाताला व खांद्याला तर, सुनील यांच्या हाताला दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१ पिकअप वाहनासह, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान ०१ इमर्जन्सी वाहनासह घटनास्थळी पोहोचले. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच घटनास्थळी पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने कापून बाजूला करण्याचे काम सुरू आहे.