डोंबिवली जवळील देसलेपाडा येथील एकतानगर मधील एका गृहसंकुलातील सदनिकेतून मानपाडा पोलिसांनी सहा किलो वजनाचा एक लाख ९० हजार रूपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील जंगलात गांजाचे उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिली. हा गांजा मुंबई, ठाणे, कल्याण भागात विक्रीसाठी आणला जातो. हा गांजा महाविद्यालयीन विद्यार्थी, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये विकला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

मयुर मधुकर जडाकर (२५, राहणार- महावीर संकुल, देसलेपाडा), अखिलेश राजन धुळप (२६, राहणार- बाळकृष्ण भवन, हनुमाननगर, डोंबिवली पूर्व), सुनील उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा (२०, राहणार- लाकड्या हनुमान, शिरपूर, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या एकतानगरमधील महावीर अपार्टमेंटमधील खोली क्रमांक ३०२ मध्ये गांजाचा अवैध साठा करून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणाहून शहराच्या विविध भागात गांजा विकला जात असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, गुन्हे शोध पथकाचे पथक साध्या वेशात महावीर संकुलात पोहचले. गांजा साठा असलेल्या खोलीचा दरवाजा उघडताच, आत प्रवेश करून पथकाने शोधाशोध सुरू केली. आरोपी मयुर व अखिलेश तेथे उपस्थित होते. त्यांची घाबरगुंडी उडाली. पिशव्यांमध्ये सहा किलो गांजा बंदिस्त होता. बाजारात या गांजाची किंमत एक लाख ९० हजार रूपये आहे. पोलिसांनी दोन्ही तरूणांना अटक केली.

या तरूणांनी गांजा धुळे येथील शिरपूर जवळील लाकड्या हनुमान गावचा सुनील पावरा आणि त्याच्या साथीदाराकडून विकत आणला असल्याची माहिती दिली. शिरपूर जवळील दुर्गम भागात गांजा उत्पादन घेतले जाते. यापूर्वी भिवंडी, कल्याण, ठाणे परिसरात पकडण्यात आलेला गांजा शिरपूर येथून विकत आणल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली होती.

विद्यार्थ्यांना, उच्चभ्रू वस्तीत गांजा विक्री होत असल्याचा संशय –

डोंबिवलीतील मध्यवर्गीय वस्तीत गांजा साठा सापडल्याने पोलीस हैराण आहेत. हा गांजा महाविद्यालयीन विद्यार्थी, उच्चभ्रू वस्तीमधील काही लोकांना विकला जात असावा असा संशय पोलिसांना आहे. मानपाडा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. गांजाची वाहतूक निदर्शनास येऊ नये म्हणून गांजा तस्कर शाळकरी मतिमंद मुलाच्या शालेय दप्ताराचाही वापर करतात. मतिमंद मुले अनभिज्ञ असल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही, अशीही माहिती यापूर्वी पोलीस तपासात पुढे आली आहे.

डोंबिवली शहर परिसरात कोठेही गांजा साठा कोणी केला असेल याची माहिती रहिवाशांना असेल, तर त्यांनी तत्काळ जवळचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी केले आहे.