कल्याण : टिटवाळ्या जवळील वासुंद्री भागात पाटीलनगर भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी कपडे धुण्यासाठी गावाजवळील काळू नदीत मंगळवारी दुपारी गेल्या होत्या. कपडे धूत असताना अचानक एक कपडा नदी पात्रात पडला म्हणून तो घेण्यासाठी एक बहिणीने पाण्यात उडी घेतली. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे बहिण वाहून जात बुडू लागल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी दुसऱ्या बहिणीने पाण्यात उडी घेतली आणि दोन्ही बहिणी नदीत बुडाल्या, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

रुक्षान वाहिद हुसेन अन्सारी (१५), सना वाहिद हुसेन अन्सारी (१०) अशी दोन्ही बहिणींची नावे आहेत. त्या टिटवाळ्या जवळील वासुंद्री भागातील पाटीलनगर मधील झुबेर चाळ भागात कुटुंबीयांसह राहत होत्या. त्या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहेत. रुक्षान आणि सना दोघी दुपारी कपडे धुण्यासाठी नदीवर आल्या होत्या. बराच उशीर झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत म्हणून कुटुंबीय अस्वस्थ झाले. म्हणून मुलीचे पालक नदी काठी आले तर त्यांना किनारी कपड्यांची बादली आणि कपडे दगडावर ठेवलेले असल्याचे दिसले.

कपडे धुऊन त्या परिसरात कोठे फिरण्यासाठी गेल्या आहेत असे त्यांना पालकांनी सुरूवातीला वाटले म्हणून त्यांनी मोठा आवाज देऊन दोन्ही बहिणींना बोलविण्याचा प्रयत्न केला. त्या आवाजालाही त्या प्रतिसाद देत नव्हत्या. परिसरात फिरूनही दोन्ही बहिणी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या असाव्यात असा संशय पालकांना आला. त्यांनी तातडीने ही माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभाग प्रमुख नामदेव चौधरी यांनी तातडीने अग्निशमन पथकाला वासुंद्री येथे नदी काठी जाण्याची सूचना केली.

अग्निशमन जवानांनी तात्काळ ट्युबची बोट पाण्यात उतरून मुली बुडाल्या भागाचा शोध सुरू केला. बोटीच्या साहाय्याने पाणी ढवळून काढून मुली कोठे नदी काठच्या झाडा झुडपांना, गाळात अडकल्या असतील त्या बाहेर येतील असे प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न सुरू असताना नदीचे पाणी ढवळल्याने नदी पात्रातील गाळातून अचानक एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागला. जवानांनी तिला तातडीने नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पण ती मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. सना अन्सारीचा मृतदेह सापडल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख चौधरी यांनी दिली. दुसऱ्या मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. या घटनेने पाटीलनगर भागात शोककळा पसरली आहे. नदी पात्रातील वेगवान खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.