Thackeray bandhu / ठाणे – ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांत वारंवार एकत्र आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी समाज माध्यमांवर “ठाकरे हा फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसासाठी लाईफ टाइम गॅरंटी आहे” असा आशय पोस्ट केला आहे. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. यासाठी मुंबईतील वर्ली येथे आवाज मराठीचा या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी आले आहेत. त्यामुळे ४ महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची १० वी भेट आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले. असे असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी समाजमाध्यांवर ठाकरे हा फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसासाठी लाईफ टाईम गॅरंटी आहे अशा आशयाची पोस्ट टाकली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया उमटवल्या आहेत.

ठाकरे बंधुच्या आजपर्यंत १० वेळा गाठीभेटी, कधी आणि कुठे?

५ जुलैला मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर आले. यानंतर २७ जुलै रोजी मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले. २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन सहकुटुंब गणरायाचे दर्शन घेतले. १० सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या सोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले.

५ ऑक्टोंबरला खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र सहकुटुंब आले. त्याच दिवशी राज ठाकरे कार्यक्रम संपल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले. १२ ऑक्टोबर राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेले होते. १७ ऑक्टोबरला मनसे दीपोत्सव उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र होते. २२ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले होते. २३ ऑक्टोबरला भाऊबीज निमित्त ठाकरे कुटूंब पुन्हा एकत्र आले.