कल्याण – उल्हासनगर पालिकेच्या उल्हासनगर क्रमांक तीनमधील शाळा क्रमांक सात मधील एका शिक्षकाचा दहा वर्षापूर्वी टेम्पो अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी मोटार वाहन अपघात न्याय प्राधिकरणाकडे मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यात मोटार वाहन न्यायधिकरणाचे सदस्य आर. व्ही. मोहिते यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे मृत शिक्षकाच्या वारसांना टेम्पो मालक आणि विमा कंपनी यांना ८७ लाख १३ हजार ८५६ रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

राजकुमार असुदोमल मोहनानी (५५) असे टेम्पो अपघात मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. राजकुमार यांचे वारस पत्नी भारती (६०), मुलगा संदीप (३८), मुलगी रश्मी यांनी हा दावा न्यायधिकरणासमोर दाखल केला होता. या प्रकरणात टेम्पो मालक ज्योती के. रामचंदानी आणि या वाहनाची विमा अपघात कंपनी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

राजकुमार मोहनानी हे उल्हासनगर पालिकेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांना दरमहा ६३ हजार ५९४ रूपये वेतन होते. त्यांच्या उत्पन्नावर कुटुंबाचे अवलंंबित्व होते. अपघातानंतर एक वर्ष राजकुमार कोमात होते. याप्रकरणाची माहिती अशी, की ३१ जुलै २०१५ रोजी शिक्षक राजकुमार मोहनानी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून उल्हासनगर क्रमांक तीन येथून सुनीता अपार्टमेंट समोरील रस्त्यावरून चालले होते. रस्त्यावर खड्डे होते. ते खड्डे चुकवित जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या एका टेम्पो चालकाने बाजुने वाहन जाते आहे का याची माहिती न घेता अचानक टेम्पोचा दरवाजा उघडला.

त्याचवेळी राजकुमार तेथून दुचाकीने जात असताना त्यांना दरवाजाचा जोरदार फटका बसला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात वर्षभर उपचार सुरू होते. ते कोमामध्ये होते. त्यांच्या उपचारासाठी २५ लाखाहून अधिक खर्च झाला. ३१ जुलै २०१६ रोजी उपचार सुरू असताना राजकुमार यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे शिक्षक राजकुमार यांचा मृत्यू झाल्याने मोहनानी कुटुंबीयांनी ॲड. जी. ए. विनोद यांच्यामार्फत मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणात एक कोटीचा दावा दाखल केला होता. टेम्पो मालकाकडून ॲड. आर. आर. अभ्यंकर न्यायाधिकरणासमोर बाजू मांडत होते.

न्यायाधिकरणाने पोलीस अहवाल, वैद्यकीय अहवाल, पंचनामा, परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. तपासी पोलीस अधिकारी स्वप्निल केदार यांनी सीसीटीव्ही चित्रण न्यायालयात पेनड्राईव्हच्या माध्यमातून दाखल केले होते. हे पुरावे तपासून न्यायाधिकरणाने टेम्पो, दुचाकीचे वाहन क्रमांक, चालक यांची स्पष्टता सीसीटीव्ही चित्रणातून दिसत नाही, पण याठिकाणी टेम्पो चालकाने टेम्पोचा दरवाजा उघडल्यावर दुचाकी स्वार खड्डे चुकवत असताना दरवाजावर आदळतो हे स्पष्ट दिसते असे निरीक्षण नोंदवले.

या अपघाताला टेम्पोचा चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत राजकुमार मोहनानी यांच्या कुटुंबीयांना ८७ लाख भरपाई दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून नऊ टक्के वार्षिक व्याजाने देण्याचे आदेश दिले.