उल्हासनगर : उल्हासनगरातील एका खासगी बालवाडील एका तीन वर्षीय बालकाच्या कानशिलात लगावल्यानंतर वातावरण तापले असतानाच सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बालवाडीवर धडक दिली. प्रशासनाला जाब विचारल्यानंतर काही वेळाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या खासगी बालवाडीत नासधूस केली. बालकाला मारहाण प्रकरणाची चौकशी होऊन सर्व बालवाड्यांमध्ये काही नियमांची पूर्तता करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

उल्हासनगरात एका तीन वर्षाच्या मुलाला खासगी बालवाडीत धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले होते. या प्रकाराची बालवाडीतील एक चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. या चित्रफितीमध्ये एक महिला शिक्षिका तेथील एका चिमुकल्याला कविता शिकवत असल्याचे दिसते आहे. कविता बोलताना टाळी वाजवण्याचेही ही शिक्षिका सांगत असल्याचे त्यात दिसते आहे.

मात्र चिमुकला शिक्षिका सांगते त्याप्रमाणे टाळी वाजवत नसल्याने त्या शिक्षिकेने थेट त्या चिमुकल्याच्या कानशिलात लगावल्याचे दिसते. त्यामुळे चिमुकला घाबरल्याचेही त्या चित्रफितीत दिसतो. त्यानंतरही शिक्षिका त्या मुलाला कविता बोलताना टाळी वाजवण्यासाठी आग्रह धरताना दिसते. त्यानंतरही ती महिला शिक्षिका त्या बालकाच्या कानशिलात लगावतानाच दिसते आहे. शेवटी एका फटक्यामुळे त्या बालकाचा तोलही बिघडताना त्या चित्रफितीत दिसते आहे.

ही चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर त्या महिला शिक्षिकेविरूद्घ उल्हासनगर शहरात एकच संताप व्यक्त केला गेला. या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये शालेय बालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. याप्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते असतानाच सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेवर धडक दिली.

यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना सकारात्मक उत्तरे मिळाले नसल्याने मनसे पदाधिकाऱ्यांचा संताप वाढला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेची नासधूस केली. शाळेबाहेर असलेल्या फलकांची मोडतोड करण्यात आली.

मनसेच्या मागण्या

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शाळेत शिक्षकांना नियुक्त करतांना त्यांच्या मानसिक पार्श्वभूमीतीची तपासणी व्हावी. तसेच त्यांचे पोलीस चारित्र पडताळणीही करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात यावेत. त्यांचे चित्रण पाहण्याची संधी पालकांनाी मिळावी. सोबतच संबंधित शिक्षिकेसह शाळा प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शाळा प्रशासन म्हणते

संबंधित शिक्षिकेला तात्पुरत्या स्वरूपात सेवेत घेतले होते अशी माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. ही चित्रफित ऑगस्ट महिन्यातील आहे. त्या शिक्षिकेला शाळेतून यापूर्वीच काढण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. तर शाळा संचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.