ठाणे : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर कोसळलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊल उचलले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी ठाण्यातून थेट फोनवर संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना त्वरित मदत पोहोचवून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे स्पष्ट आणि कठोर निर्देश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामूळे मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थीतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात, साकत गावात पूर आल्याने संपर्क तुटला आहे आणि नागरिक अडकले आहेत, ज्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात नांदेडमध्ये तीन, बीडमध्ये दोन आणि हिंगोलीत एका व्यक्तीचा समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यातील साकत गावात अडकलेल्या १२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) टीमची मदत घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठवाड्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.
ठाणे शहरातून उपमुख्य एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्याची सध्याची परिस्थिती जाणून घेतली. तसेच लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफ च्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा, तसेच वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर शिंदे स्वतः लक्ष ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे.