ठाणे : लोकल ही नागरिकांसाठी केवळ वाहतूक व्यवस्था नसून रोजच्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. मात्र या ‘जीवनवाहिनी’ची अवस्था आता एवढी वाईट झाली आहे की, प्रवाशांनी छपराखाली नाही तर छपरातून गळणाऱ्या पाण्याखाली प्रवास करावा लागतोय. वेळापत्रक कोलमडलेले, फलाट धोकादायक, पूल मोडकळीस आलेले, आणि आता डब्यांमधून पावसाचे पाणी थेट अंगावर.
गुरूवारी रात्रीच्या सुमारास ठाण्याहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमधील गळतीने प्रवाशांचा त्रास शिगेला पोहचला असून, रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही व्यवस्था ‘जीवनवाहिनी’ आहे की ‘जलवाहिनी’, असा सवाल संतप्त प्रवासी विचारू लागले आहेत.
लोकल गाडी ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी लोकल गाडीतून कामानिमित्त प्रवास करतात. गेल्या काही वर्षांमध्ये कर्जत, बदलापूर या परिसरातील लोकवस्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. येथील बहुतेक प्रवासी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे नोकरीकरिता येत असतात. इतर मार्गाने प्रवास करणे अधिक खर्चिक असल्याने हे प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्राधान्य देतात. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते.
रखडलेले वेळापत्रक, लोकल गाडीतील गर्दी, फलाटांवरील गर्दी अशा विविध समस्यांना प्रवासी दररोज सामोरे जात असतात. पावसाळी या समस्यांमध्ये काही प्रमाणात भर पडते. गाडीचा दरवाजा आणि खिडकीतून पावसाचे पाणी आत येत असते. अशातच गुरूवारी रात्री ठाण्याहून कर्जतकडे वाहतूक करणाऱ्या लोकल गाडीत प्रथम दर्जाच्या डब्यामध्ये अचानक पावसाच्या पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले.
मागील काही दिवसांपुर्वी कर्जतहून मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या लोकल गाडीतही ज्येष्ठ नागरिकांच्या डब्यांमध्ये गळती होत असल्याचे प्रकार उघडकीस आला होता.
मागील दोन ते तीन वर्षात पावसाळ्यामध्ये लोकल गाडीत गळती होत असल्याच्या घटना समोर येतात. यामुळे खुप आश्चर्य वाटू लागले आहे. कारण, एसटी महामंडळच्या बस गाडीत गळती या घटना समोर यायच्या पण लोकल गाडीबाबत हा प्रकार कधी झाला नव्हता. गाडीची देखभाल दुरूस्ती झाली नसताना जर गाडी वाहतूक करत असेल तर त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कारशेडमध्ये गाडी असताना त्याची डागडुजी होते का याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सदर डब्ब्याचा त्वरित तपास करण्यात येईल आणि आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. – प्रविण पाटील, वरीष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.