Ganesh utsav : ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती. सर्व सण उत्सव सुरू करणाऱ्या दिघे यांनी टेंभी नाक्यावर हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव का सुरू केला नाही, असा प्रश्न अनेकांना पडत असून त्यावर त्यांच्या सहकाऱ्याने हा उत्सव सुरू न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे ठाण्यातील टेंभी नाक्यावर कार्यालय होते. त्यांच्या कार्यालयाला ‘आनंद आश्रम’ म्हणून ओळखले जाते. येथे दररोज रात्री दरबार भरायचा आणि गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम आनंद दिघे करत असत. त्यामुळे त्यांचे कार्यालय म्हणजेच जनतेसाठी आश्वासक दरबार मानला जायचा. टेंभी नाका परिसरात नवरात्रोत्सव आणि दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या ठिकाणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करतात. स्वातंत्र्य दिनाचेही आयोजन जवळच्या तलाव पाळी येथील शिवसेनेच्या जिल्हा शाखेत होते. हे सर्व सण उत्सव आनंद दिघे यांनी सुरू केले. त्याकाळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हती. तरीही हे उत्सव शहरात आणि शहराबाहेर प्रसिद्ध होते.

गणेशोत्सव सोडून सर्व सण उत्सव साजरे होतात

प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाणारे दिघे यांनी मलंगगड आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन, तसेच टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी उत्सव यांसारख्या सण-उत्सवांची ठाण्यात सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर या परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे सुरू ठेवल्या आहेत. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव साजरा करण्याचे प्रमाणही मोठे आहे. असे असतानाही नवरात्रोत्सव आणि दहीहंडी उत्सव यांसारखे सण-उत्सव साजरे करणाऱ्या दिघे यांनी टेंभी नाक्यावर गणेशोत्सव का सुरू केला नाही. त्यांच्यासाठी हा उत्सव सुरू करणे, हे फार अवघड नव्हते, मग त्यांनी हा उत्सव सुरू का केला नाही, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

गणेशोत्सव साजरा का केला जात नाही

आनंद दिघे यांनी गणेशोत्सव का सुरू केला नाही, याबाबत दिघे यांचे त्याकाळचे सहकारी व ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सांगितले की, ” टेंभी नाक्यावर दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवानंतर लगेच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव येतो. त्यामुळे दहीहंडी उत्सवानंतर गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे टेंभी नाक्यावर दिघे यांनी गणेशोत्सव सुरू केला नाही. टेंभी नाक्यावर गणेशोत्सव साजरा करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी चंदनवाडी येथे गणेशोत्सव सुरू केला”.

चंदनवाडीतच गणेशोत्सव का ?

ठाणे महापालिकेजवळील चंदनवाडी येथील शिवसेना शाखेत आनंद दिघे यांनी गणेशोत्सव सुरू केला. ही ठाण्यातील सर्वात पहिली शाखा होती. शिवाय, शिवसेनेचे दिवंगत ठाणे शहर प्रमुख रघुनाथ मोरे हे सुद्धा याच परिसरात राहायचे आणि ते या उत्सवाच्या ठिकाणी लक्ष देण्याचे काम करू शकतील. यामुळेच दिघे यांनी याठिकाणी गणेशोत्सव सुरू केला. याशिवाय, टेंभी नाक्यावरून गणपती विसर्जन मिरवणुका जायच्या, त्यांच्या स्वागतासाठी दिघे हे आवर्जून उपस्थित असायचे, असे सुधीर कोकाटे यांनी सांगितले.