डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकात भागात गजरा विक्री करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेचा डोंबिवली पश्चिमेतील सिध्दार्थनगर भागातील एका ४६ वर्षाच्या इसमाने दारूच्या नशेत विनयभंग केला. याप्रकरणी गजरा विक्री करणाऱ्या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीकेश शिवयश चौबे (४६) या इसमा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की पीडित गजरा विक्री करणारी महिला ही आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवलीत राहते. या गजरा विक्री व्यवसायावर या कुटुंबीयांची उपजीविका आहे. त्यामुळे सर्व कुटुंब या गजरा विक्रीच्या व्यवसायत सक्रिय आहे. सकाळी सात वाजता पीडित महिला डोंबिवली रेल्वे स्थानक भागात गजरा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करते. रात्री दहा वाजेपर्यंत गजरा, फुले विक्री संपेपर्यंत ही महिला गजरा विक्रीचा व्यवसाय करते.
शुक्रवारी रात्री जवळील सर्व गजरे संपल्यानंतर पीडित महिला रात्री अकरा वाजता आपला गजरा विक्रीचा व्यवसाय बंद करून घरी चालली होती. डोंबिवली पूर्व नेहरू रस्ता भागातून एका दुकानातून कुटुंबीयांसाठी आईसक्रिम घ्यावे आणि घरी जावे असा विचार या महिलेने केला. पीडित महिला नेहरू रस्त्याने एकटीच जवळील पिशवीत सामान घेऊन पायी चालली होती. नेहरू रस्त्यावरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या भाजी मंडई येथून जात होती. गजरा विक्री पीडित महिलेच्या पाठीमागून अचानक येऊन एका इसमाने महिलेचा भर रस्त्यात विनयभंग केला. हा इसम महिलेशी असभ्य, अश्लील संभाषण करू लागला. त्यावेळी पीडित महिलेने त्याला तू कोण. मी तुला ओळखत नाही, असे सांगून त्याला झिडकारण्याचा प्रयत्न केला. या संभाषणाच्यावेळी समोरील इसम दारू प्यायला असल्याचे गजरा विक्री महिलेच्या लक्षात आले.
या इसमाची महिले बरोबरची अश्लील भाषा सुरू होती. त्यावेळी संतप्त गजरा विक्री महिलेने हाताने त्या इसमाच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. त्या इसमाने हात पुढे केल्याने तो बचावला. महिलेच्या हाताचा फटका त्या इसमाच्या नाकाला लागला. हा इसम दारू प्यायला असल्याने तो काहीही करण्याची शक्यता होती. त्यामुळे पीडित महिलेने बचावासाठी ओरडा सुरू केला. तेव्हा रस्त्यावरील नागरिक या महिलेच्या मदतीसाठी धावले. नागरिक आणि महिलेने या इसमाला पकडून रामनगर पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा त्याची चाचणी केली असताना तो दारू प्यायला होता हे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या इसमाला नाव विचारले त्याने आपले नाव श्रीकेश शिवयश चौबे असल्याचे आणि डोंबिवली पश्चिमेतील सिध्दार्थनगर झोपडपट्टीत राहत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीकेश चौबे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.