मुंब्य्राच्या बंजारा वस्तीतील नागरिकांची आर्त हाक

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ‘‘करोनामुळे देशातील टाळेबंदी अजून किती दिवस राहील, याचा काहीच नेम नाही आणि दररोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारेही आम्हाला आणखी किती दिवस पोसणार. त्यामुळेच आम्हाला आता आमच्या गावाला जाऊ  द्या. हवे तर आम्हीच बसची व्यवस्था करतो. पण आम्हाला इथून घरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी परवानगी द्या‘‘, अशा भावना मुंब्य्रातील बंजारा वस्तीमधील रोजंदार कामगारांनी व्यक्त केल्या. मेहनतीची कामे करीत असल्यामुळे या रहिवाशांच्या जेवणात भाजी भाकरी असा आहार असतो. मात्र, त्यांना आता दोन वेळेस भाताच्या प्रकाराचे जेवण मिळत असून या आहारामुळेच अनेकांना आता इथे रहाणे नकोसे वाटत असल्याचे काही रहिवाशांनी सांगितले.

मुंब्य्राच्या बंजारा वस्तीमधील रहिवासी प्रेम राठोड यांच्यासह इतर रहिवाशांनी लोकसत्ताशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘आमच्या वस्तीमधील रहिवाशी मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे आता मजुरीचे कामही बंद झाले आहे. हाताला काम नसल्यामुळे घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न उभा ठाकला आहे.’’, असे प्रेम राठोड यांनी सांगितले.

‘‘करोनाचा प्रादुर्भाव आता वाढतोच आहे आणि त्यामुळेच देशातील टाळेबंदी अजून किती दिवस राहील, याचा काहीच नेम नाही. गावी अर्धे कुटुंब आणि अर्धे कुटुंब इथे अशी आमची अवस्था असून दोन्हीकडच्या लोकांना एकमेकांची चिंता वाटू लागली आहे. गावी आता ज्वारी आणि बाजरीची पिके आली असून त्यावर आमची सहा महिने गुजराण होईल, असेही त्यांनी सांगितले.

मजुरी बंद

मुंब्रा बाह्य़वळण मार्गालगत डोंगराच्या पायथ्याशी बंजारा वस्ती आहे. अतिशय दाटीवाटीच्या वस्तीत पत्र्याच्या खोल्या आहेत. सुमारे ४०० कुटुंबे या ठिकाणी वास्तव्य करीत असून हे सर्वजण कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्य़ाचे रहिवासी आहेत. हे सर्वजण इमारत बांधकाम किंवा अन्य ठिकाणी मोलमजुरीचे काम करतात. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी टाळेबंदी लागू झाल्याने त्यांचेही मजुरीचे काम ठप्प झाले असून यामुळेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.