लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: दारु पिऊन सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याची गुरुवारी दुपारी रागाच्या भरात तरुणाने धारदार चाकुने राहत्या घरात हत्या केली. या घटनेनंतर तरुण तमीळनाडूतील आपल्या मूळ गावी पळण्याच्या प्रयत्नात असताना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घटनेनंतर दोन तासात अटक केली.

मारिकन्नी तेवर असे मयत व्यक्तिचे नाव आहे. तो इडली विक्रेता होता. त्याला दारुचे व्यसन होते. मारिकन्नी कुटुंबासह खंबाळपाडा भागात राहत होता. रमेश वेलचामी (तेवर) असे आरोपीचे नाव आहे. आज दुपारी मारिकन्नी तेवर दारु पिऊन घरी आला. भोजन झाल्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरात बहिणीचा भाऊ रमेश वेलचामी उपस्थित होता. त्याने मारिकन्नी यांना सुरुवातीला शांत राहण्यास सांगितले. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवीगाळ करण्यावरुन मारीकन्नी आणि आरोपी रमेश यांच्या भांडण झाले. रागाच्या भरात रमेशने घरातील चाकुच्या साहाय्याने मारिकन्नीवर वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश घरातून पळून गेला.

आणखी वाचा- ठाणे – बोरिवली भूमिगत मार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा; एल. ॲण्ड टी.ची निविदेविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिळकनगर पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल होताच, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी तपास पथके तयार करुन तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. रमेश धारावी किंवा तमीळनाडूतील मूळ गावी पळण्याची शक्यता विचारात घेऊन पोलिसांची दोन पथके त्याचा मुंबई, कल्याण रेल्वे स्थानकात शोध घेऊ लागली. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ गु्न्हे शाखेचे उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार गुरुनाथ जरग, प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव यांचे साध्या वेशातील पथक तैनात होते. त्यांच्याजवळ रमेशचे छायाचित्र होते. एक तरुण कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहावर चेन्नई एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. तो रमेश असल्याचा अंदाज करुन पोलिसांनी त्याला हटकले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी करताच त्याच्याजवळ तमीळनाडू प्रवासाचे तात्काळचे तिकीट होते. तो आरोपी रमेश असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. नातेवाईकाचा खून करुन मूळ गावी पळून जाणार असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.