डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरातून मद्य विक्रीच्या दुकानातून दारू आणि अन्य दुकानातून चखणा खरेदी करायचा. आणि बिनधास्तपणे मोकळ्या आल्हादायक वातावरणातील डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव माणकोली उड्डाण पुलावर जाऊन दारू प्यायची असा एक पायंडा डोंबिवलीतील टवाळखोर तरूणांमध्ये पडला आहे. त्यामुळे रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत माणकोली उड्डाण पूल मद्यपी, दुचाकींवरून जीवघेणे थरार करणारे तरूण यांनी गजबजून गेलेला असतो.
माणकोली उड्डाण पूल आता दारूचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. माणकोली उड्डाण पुलावरील मद्यपींची गर्दी आणि तरूणांचे दुचाकी, मोटारीतून जीवघेणे थरार पाहून या टवाळखोर तरूणांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई, ठाणे परिसरातील आपली रात्रपाळीचे काम संपवून अनेक नोकरदार खासगी, भाड्याच्या वाहनाने डोंबिवलीत माणकोली उड्डाण पुलावरून येतात. त्यावेळी अनेक मद्यसेवन केलेले तरूण पुलावरील रस्त्यावर पेंगत वाहनाला आडवे येत वाहने थांबविण्याचा प्रयत्न करतात. वाहने थांबवली नाही की हातामधील वस्तू त्या वाहनाच्या दिशेन फेकून मारतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
दिवसभर वाहनांनी गजबजलेला माणकोली मोठागाव येथील उल्हास खाडीवरील पूल रात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुनासुना असतो. या कालावधीत डोंबिवली, भिवंडी शहर परिसरातील अनेक टवाळखोर तरूण हातात दारूच्या बाटल्या, चखणा घेऊन आपल्या दुचाकी, मोटारीने माणकोली उड्डाण पुलावर येतात. आणि या पुलाच्या कठड्यांवर बसून कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे मद्य सेवन, सिगारेट झुरके हवेत सोडत या भागात रात्रभर फिरत असतात. रात्रीच्या वेळेत या पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांंना हे मद्यपी अलीकडे आडवे येऊन वाहने थांबविण्याचे प्रकार करू लागले आहेत. अनेक वेळा या वाहनांमध्ये नोकरीवरून सुटलेल्या तरूणी, महिला असतात. त्याचा विचार न करता मद्यपी वाहने रोखण्याचा प्रकार करत आहेत.
पुलाच्या एका बाजुला मोटारी उभ्या करून त्या वाहनांमध्ये काही तरूण मद्यसेवन करत असल्याचे चित्र पुलावर आहे.स्पोर्टस किंवा सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी घेऊन काही तरूण पुलावर कानठळ्या, कर्णकर्कश आवाज करत आपली दुचाकी वाहने जीवघेणे थरार करत पुलाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत दोनशे ते तीनशेच्या वेगाने पळवतात. हा थरार पाहून यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादा तरूण वाहन नियंत्रणात आले नाहीतर थेट दुचाकीसह खाडीच्या पाण्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासंदर्भात मोठागावमधील रहिवासी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी वरिष्ठ आणि स्थानिक पोलीस विभागाला समाज माध्यमांतून माणकोली पुलावरील रात्रीची गस्त वाढवून या पुलावर सुरू असलेले गैरधंदे बंद करण्याची मागणी केली आहे.
मागील तीन महिन्यापासून विष्णुनगर पोलीस, पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने माणकोली पुलावर रात्रीच्या वेळेत गस्त घालून अनेक टवाळखोर तरूणांवर कारवाई केली होती. अशाचप्रकारची मोहीम पोलिसांनी नव्याने सुरू करण्याची मागणी प्रवाशांची आहे.
