कुठलीही भटकंती ही सुरुवातीला हौस-आवड असते. तिच्यात सातत्य आणि नावीन्य येऊ लागले, की मग नकळतपणे या भटकंतीला एखाद्या अभ्यासाची दिशा-दृष्टी मिळते. आजवर अनेकांनी या भटकंतीच्या छंदातून नवनव्या विषयांवर संशोधनाचे योगदान दिले आहे. ठाण्यातील एक दुर्गभटके सदाशिव टेटविलकर यांनी भटकंतीच्या याच छंदातून ‘वीरगळ’ या आजवर दुर्लक्षित विषयाच्या अभ्यासाची वाट धरली, त्यावर प्रकाश टाकला.
गेली चार दशके सातत्याने सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये भटकंती करणाऱ्या टेटविलकरांची या वीरगळांबरोबरची गाठभेट या छंदाबरोबरच पडली. पण दहा वर्षांपूर्वी कोकणातील अशाच एका वीरगळाची पाहणी करताना त्यावर कोरलेला एक लेख त्यांच्या निदर्शनास आला आणि पाहता-पाहता या वीरगळात ते गढून गेले. मग या एकाच विषयाचा ध्यास त्यांनी घेतला. सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यापासून ते महाराष्ट्रातील गावागावात त्यांनी भटकंती सुरू केली आणि त्यातून नुकतेच ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ हे त्यांचे संशोधनपर पुस्तक प्रसिद्ध झाले.
वीरगळ म्हणजे युद्धात पराक्रम करून प्राणाची आहुती दिलेल्या वीराचे स्मारक. काही ठिकाणी वीरगळांबरोबरच सतीशिळाही आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर उडी घेऊन पत्नीने प्राण त्याग केला, की त्याचे स्मारक म्हणून अशी सतीशीळा उभा केली जाते. ही सतीची प्रथा आता कालबाह्य़ झाली असली तरी सतीशिळांच्या रुपाने तिचे पुरावे आजही अनेक ठिकाणी दिसतात. इतिहासाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनेही या सतीशिळा उपयोगी पडतात. प्राचीन संस्कृतीचे गाढे अभ्यासक गुंथर डी सोंथायमर यांनी सर्वप्रथम या वीरस्मारक शिळांकडे लक्ष वेधून इतिहासाच्या अभ्यासात त्या मोलाचे ठरू शकतात, हा विचार मांडला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात प्रामुख्याने कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये आढळणाऱ्या वीरगळांविषयी लिहिले. टेटविलकरांनी मात्र महाराष्ट्रातील वीरगळांवर लक्ष केंद्रित केले. त्यांचे हे काम अधिक आव्हानात्मक होते. कारण दक्षिणेतील अथवा उत्तरेतील प्रांतात आढळणाऱ्या वीरगळांवर त्या वीराचे नाव, गाव किंवा युद्धाचे थोडक्यात वर्णन कोरलेले आढळून येते. महाराष्ट्रातील वीरगळांचा मात्र अंदाजानेच अर्थ लावावा लागतो. हे आव्हान पेलून टेटविलकरांनी दशकभर भटकंती, अभ्यास केला आणि या साऱ्यांतूनच त्यांचा या विषयावरचा अभ्यास ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. भटकंतीच्या छंदातून घडलेले हे आगळे-वेगळे संशोधन आहे. दहा वर्षांपूर्वी टेटविलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्लेतील मठगांव येथील शिवमंदिरास भेट दिली. तेव्हा तेथील एका वीरगळावर त्यांना एक शिलालेख दिसला. युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पराक्रमी वीराची मुलाने उभारलेली ती स्मारकशिळा होती. या स्मारकशिळेपासून प्रेरणा घेत टेटविलकरांनी जणू अवघा महाराष्ट्रच पुन्हा भटकून काढला. त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी किल्ला, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्र गड, जीवधन, नाणेघाट, भीमाशंकर, उंबरखिंड, सुधागड, रायगड, राजगड, भोरघाट, आंबेघाट अशा अनेक ठिकाणांना खास वीरगळांच्या शोधासाठी त्यांनी भेटी दिल्या. एखादा विषय निवडला की त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय टेटविलकर स्वस्थ बसत नाहीत. इतर विषयांच्या मानाने वीरगळांनी त्यांना जरा जास्तच झपाटले. बरीच वर्षे ते या स्मारकशिळांच्या मागावर होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गड किल्ल्यांवरील स्मारकशिळा आणि सतीशिळांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले, त्यांची छायाचित्रे काढली. शिलाहारकालीन स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरातही त्यांना वीरगळ आणि सतीशिळा आढळल्या.   
सर्वसाधारणपणे वीरगळांचा उगम दक्षिणेकडे झाला असे समजले जाते. त्यामुळे टेटविलकरांनी गोवा, कर्नाटक या दक्षिणेच्या प्रदेशांना भेटी दिल्याच, शिवाय उत्तरेतील दमण, सुरत, सौराष्ट्र ते दीवपर्यंतच्या प्रदेशातील सतीशिळा व वीरगळांचाही अभ्यास केला. त्यामुळे विविध प्रदेशात आढळणाऱ्या वीरगळांची वैशिष्टय़े, त्यांच्यातील फरक यांची तुलना करून त्यांना काही निष्कर्ष मांडता आले. महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश, कोकण, औरंगाबाद आदी परिसर पिंजून, ठिकठिकाणी असलेल्या वीरगळांना भेट देऊन सोंथायमर यांनी दाखवून दिलेली इतिहास संशोधनाची नवी वाट टेटविलकरांनी अधिक प्रशस्त केली. कारण अगदी दोन हजार वर्षांपासून वीरांची अशी स्मारके उभारण्याची प्रथा अस्तित्वात असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.  सिंधुदुर्ग ते ठाणे या कोकणपट्टीत तसेच नाशिक, औरंगाबाद व धुळे येथे आढळणाऱ्या वीरगळांच्या निरीक्षणातून त्यांनी त्या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या चालीरीतींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या स्मारकातून सर्व जाती-जमातींमध्ये पराक्रमी वीरांचा मानसन्मान होत होता. ठिकठिकाणी आढळणाऱ्या या स्मारकशिळा म्हणजे स्थानिक इतिहासाच्या ठळक खुणा असून त्यांचे पुढील पिढय़ांच्या माहितीसाठी कसोशीने जतन केले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.  
पारंपरिक विद्यापीठीय उच्च शिक्षणाची बैठक नसतानाही टेटविलकरांनी केवळ भटकंतीच्या हौसेतून संशोधनाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. ‘वीरगळ’ हे त्यांचे सातवे पुस्तक. याआधी दुर्गयात्री, दरुगसंपदा ठाण्याची, ठाणे किल्ला, विखुरल्या इतिहास खुणा, गडकिल्ल्यांच्या जावे गावा, दुर्गलेणी दिव-दमण गोवा अशी त्यांची सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ठाणे जिल्ह्य़ात ३७ किल्ले असल्याचा ‘गॅझेटिअर’मध्ये उल्लेख होता आणि अनेक जण त्याचीच री ओढत होते. ‘दुर्गसंपदा ठाण्याची’ या पुस्तकाद्वारे टेटविलकरांनी ठाण्यात ३७ नव्हे, तर ५५ किल्ले आहेत, हे सचित्र दाखवून दिले.
ठाणे खाडीकिनारी नागला बंदराजवळ असलेला किल्ला (नागला कोट) दगडखाण मालकांनी दगड काढण्याच्या नादात उद्ध्वस्त केला. अगदी प्रशासनानेही इथे किल्लावगैरे नसल्याचा खुलासा केला. तेव्हा टेटविलकरांनी नागला कोटची दुर्मीळ छायाचित्रे दाखवून संबंधितांना खरा इतिहास दाखवून दिला. विशेषत: ‘ठाणे खाडीलगतचे किल्ले’ हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे.  आता वयाची साठी उलटली असली तरी त्यांचा उत्साह एखाद्या तरूणाला लाजविणारा आहे. तीस वर्षांपूर्वी त्यांनी सह्य़ाद्री परिक्रमा केली होती. त्र्यंबकेश्वर ते सिंधुदुर्ग असा तब्बल अकराशे किलोमिटरचा प्रदेश त्यांनी त्यासाठी पालथा घातला. हे अंतर प्रत्यक्षात ८०० किलोमिटर असले तरी डोंगरांवरील चढ उतारांमुळे अंतर वाढले. त्यावेळी लिहिलेली टिपणे त्यांच्याकडे आहेत. आता पुन्हा एकदा त्याच मार्गाने प्रवास करून सह्य़ाद्रीवर एक पुस्तक लिहिण्याची त्यांची इच्छा आहे.
   

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!