सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट, मकालू, लोत्सेसह ३० हून अधिक हिमशिखरांवर आपली मुद्रा उमटवणाऱ्या  ‘गिरिप्रेमी’ने यंदाच्या हंगामात ‘इंद्रासन’ या अपरिचित शिखराकडे आपल्या मोहिमेचे नुकतेच प्रस्थान ठेवले आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक बचेंद्री पाल यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देऊन या मोहिमेला नुकत्याच शुभेच्छा देण्यात आल्या.
‘इंद्रासन’ हे हिमालयातील पिरपांजाल भागातील एक अपरिचित असे हिमशिखर आहे. याची उंची ६२२१ मीटर असून ते चढाईसाठी तांत्रिकदृष्टय़ा अतिशय कठीण समजले जाते. खडी चढाई, बर्फ आणि खडक मिश्रित भूस्तर यामुळे या शिखरावर खूप कमी गिर्यारोहकांनी चढाईसाठी प्रयत्न केले आहेत. १९६२ मध्ये जपानच्या गिर्यारोहकांनी हे शिखर सर्वप्रथम सर केले. पण भारतीयांना यावर आपले पाऊल ठेवण्यासाठी २००४ साल उजाडले. त्या वर्षी पश्चिम बंगालच्या गिर्यारोहकांनी हे यश प्राप्त केले. यानंतर भारतीय पर्वतारोहण संस्थेच्या २००७ आणि २०१२ या दोन मोहिमांना हे यश मिळाले आहे. अशा या अपरिचित शिखराचा वेध घेण्यासाठी ‘गिरिप्रेमी’ने यंदा पाऊल टाकले आहे.
भूषण हर्षे यांच्या नेतृत्वाखाली जात असलेल्या या मोहिमेमध्ये गणेश मोरे, अक्षय पत्के, डॉ. सुमित मांदळे हे गिर्यारोहक सहभागी आहेत. ‘इंद्रासन’च्या जोडीनेच त्याच्या शेजारील ‘५२६०’ या अनामिक शिखरावरही ‘गिरिप्रेमी’ चढाई करणार आहे. यामध्ये आनंद माळी यांच्या नेतृत्वाखाली किरण साळस्तेकर, भूषण शेठ, दिनेश कोतकर, अनिकेत कुलकर्णी, पवन हाडोळे, संकेत धोत्रे हे गिर्यारोहक सहभागी आहेत. या दोन्ही मोहिमांचे नियोजन ‘शिया गुरू’ या बेस कॅम्पवरून ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि अविनाश फौजदार हे नियोजन करणार आहेत.
या मोहिमेत प्रथमच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे काही गिर्यारोहण साहित्य वापरले जाणार आहे. याशिवाय या मोहिमेतून हिमालयाच्या या भागातील प्रदेश आणि हवामानाबाबत माहिती संकलित करण्याचे कामही केले जाणार आहे. गिर्यारोहण म्हणजे केवळ एखादा प्रांत फिरून येणे एवढा उद्देश न ठेवता त्यातून  समाजोपयोगी अभ्यास करण्याच्या हेतूने ‘गिरिप्रेमी’ आपली पावले टाकत आहे.