जिंजी ही मराठय़ांची दक्षिणेतील राजगादी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या या दक्षिण भारतातील दुर्गाच्या आश्रयानेच पुढे छत्रपती राजाराम महाराजांनीही मुघलांना तोंड दिले. कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी अशा तीन दुर्गाचा समूह असलेल्या या किल्ल्यात इतिहासातील अनेक वास्तू आपले पाय अडकवून टाकतात.

‘साल्हेरी अहिवन्तापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निश्कंठक राज्य. शतावधी दुर्ग, चाळीस हजार पागा, दोन लक्ष पदाती..ऐसी केवळ सृष्टीच निर्माण केली..’ रामचंद्र अमात्यांच्या ‘शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र’ या ग्रंथातील या ओळी मराठी साम्राज्य िहदुस्तानात कुठवर पोचले होते, याची गाथा सांगतात. वरील आज्ञापत्रातील चंदी नावाचा किल्ला म्हणजे दक्षिणेतील मराठय़ांचे तख्त असलेला जिंजीचा किल्ला होय.
अबे बार्थीलिमो कारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने शिवाजी महाराजांचे स्वप्न काय होते, ते नोंदवून ठेवले आहे. तो लिहितो, महाराजांना सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा मुलुख स्वतंत्र करावयाचा होता. या दृष्टीने त्यांची वाटचाल होती. याची प्रचिती जिंजी येथील भव्य असा दुर्ग पाहिल्यानंतर येते. जिंजी शहराच्या पश्चिमेला कृष्णगिरी, चंद्रगिरी व राजगिरी या नावाचे मोठे पहाड आहेत. हे तिन्ही पहाड तटबंदीने संरक्षित केलेले आहेत. पूर्व घाटाच्या रांगा तामिळनाडूमध्ये याच दिशेने पोहोचतात. शेकडो टन वजनाचे दगड एकमेकावर रचून ठेवल्यासारखी विवक्षित रचना येथील डोंगरांची आहे. झुडूपी जंगल व पाषाणात पण उत्तम वाढणारी कुरु उर्फ कहाणडळाची झाडे येथे सर्वदूर आढळतात. तामिळनाडू शासनाच्या मुत्तकुडू राखीव वनक्षेत्रात जिंजीचा दुर्ग समूह येतो. स्थानिक तमिळ भाषेत या किल्ल्यास चेंगी अथवा ‘सेन्जी’ म्हटले जाते. सेन्जी अम्मा या देवीच्या नावावरून या किल्ल्याचे नाव ठेवले गेले सेन्जी किंवा जिंजी.
जिंजी दुर्ग समूहातील राजगिरीची निर्मिती बाराव्या शतकात कोणार समाजाच्या आनंदा कोण याने केली. पुढे १२४० मध्ये कृष्णगिरीचा किल्ला कृष्ण कोण या राजाच्या राजवटीत बांधला गेला. १३८३ ते १७८० या कालखंडात जिंजीवर विजयनगर, नायक, मराठा, मुघल, नवाब, फ्रेंच व इंग्रज अशा अनेक राजवटी नांदल्या. या विविध राजवटीत या किल्ल्याचा विस्तार झाला. या ९ किलोमीटरच्या परिघातील किल्ल्यात आज कल्याण महाल; वेणुगोपाल, वेंकटरमणा, पट्टाभिरामा मंदिरे, सादत-उल्लाह-खान मशीद, प्रचंड मोठे धान्य कोठार, सुंदर तलाव असे बरेच पाहण्यासारखे आहे.
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हा दुर्ग नासीर मुहम्मद या किल्लेदाराकडून जिंकून घेतला व त्यास नावे दिली..शारंगगड, गर्वगड आणि मदोन्मत्तगड! हा गड जिंकून घेण्यामागची दूरदृष्टी मात्र भविष्यात कामी आली. १६८९ मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातल्यावर राजाराम महाराज निसटले. दक्षिणेतील या जिंजी किल्ल्याने त्यांना आश्रय दिला. झुल्फिकारखान नुसरतजंग या मुघल सरदाराने अखेर जिंजीला वेढा घातला. धनाजी जाधव हा मराठा वीर बाहेरून गनिमी हल्ले करत होता, पण वेढा काही ढिला पडत नव्हता. राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर चिडलेल्या मुघलांनी जिंजीवर निकराचा हल्ला चढविला. शिधा सामुग्री संपल्यामुळे मराठ्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही. ७ फेब्रुवारी १६९८ रोजी मुघल फौजांनी गड ताब्यात घेतला.
कर्नाटक व तामिळनाडूमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा सर्वत्र आढळतात. जिंजीच्या जवळच अलीकडे वेलोर नावाचा स्थळदुर्ग आहे. बळकट तटबंदी व बेलाग बुरुज ही त्याची बलस्थानं आहेत. खंदकात सदैव पाणी असायचे व त्यात सुसरी, मगरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे हा दुर्ग अजिंक्य मानला जायचा. इसवी सन १६७७ च्या मे महिन्यात शिवाजी महाराजांनी वेलोरला वेढा घातला. अब्दुल्लाखान नावाच्या एक हबशी किल्लेदाराने निकराने किल्ला लढविला. शेवटपर्यंत वेलोर हाती आला नाही. वेलोरच्या जवळ दोन टेकड्या आहेत. तिथे दोन दुर्ग उभारले व त्यांना नावे दिली..साजरा व गोजरा. या दोन किल्ल्यांवरून मराठा सरदार नरहरी रुद्र यांच्या नेतृत्वाखाली वेलोरवर मराठी फौजा तोफांची सरबत्ती करू लागल्या. चिवट सिद्दी अब्दुल्लाखान अखेपर्यंत लढत राहिला. किल्ल्यात साथीचा रोग पसरल्यामुळे अब्दुल्लाखानाचा नाइलाज झाला. रघुनाथपंत हनुमंते व नरहरी रुद्र यांनी संधी साधली. २२ जुल १६७८ रोजी ५० हजार होन देऊन मराठय़ांनी वेलोरवर भगवा जरीपटका फडकवला. अशाप्रकारे राजांनी दक्षिणेत आपले अस्तित्व निर्माण केले.
जिंजी वेलोरसह पुदुचेरी अशी अनेक ठिकाणे पाहण्याचा कार्यक्रम ठरविता येऊ शकतो. चेन्नई किंवा बंगलोर या मध्यवर्ती शहरापासून या सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य आहे. महाराष्ट्राबाहेरील मराठय़ांचा काहीसा अज्ञात पराक्रम अनुभवण्याची संधी प्रत्येकाने मिळविली पाहिजे.