सोशल मीडियाच्या जगामध्ये जेव्हा महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा एखादा व्हिडिओ शेअर करतात तेव्हा तो चांगलाच व्हायरल होत असतो. नुकताच महिंद्रांनी, ‘जगातील सर्वात वेगवान’ मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला. या लहान मुलाचा वेग बघून महिंद्राही हैराण झाले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील या लहान मुलाबाबत कुतूहल व्यक्त करतच त्यांनी आपल्या देशातही अशाच प्रकारचं कौशल्य आणि किमया करणारं कोणीतरी असेलच, असा विश्वासही व्यक्त केलाय.

अवघ्या 8 वर्षांच्या वयात या मुलानं साऱ्या विश्वाचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओतील मुलाचं नाव Rudolph ingram असून गुगलवर Fastest kid म्हणून सर्च केल्यास त्याचंच नाव समोर येतं. अमेरिकेचा रहिवासी Rudolph हा अवघ्या 8 वर्षांचा असून वेग हीच त्याची ओळख आहे. 2019 मध्ये त्याने केवळ 8.69 सेकंदांमध्ये 60 मीटर धावण्याची किमया केली होती. नंतर त्याने अवघ्या 13.48 सेकंदांमध्ये 100 मीटर अंतर धावत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याचं कौतुक करताना, ‘हा जणू एका यंत्राप्रमाणेच आहे. तो धावतो तेव्हा पायही धुसर (काहीसे दिसेनासे) होतात. तो जगातील सर्वात वेगवान पुरुष ठरेल यात शंकाच नाही’ असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.


या आठ वर्षीय मुलाचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून त्याचा धावण्याचा वेग बघून काही नेटकरी त्याला हरिणापेक्षा वेगवान, तर काही नेटकरी चित्त्यापेक्षाही वेगवान असल्याचं म्हणत आहेत.