अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जेफ बेझोस यांनी नुकतीच अजिंठा-वेरुळ लेण्यांना सहकुटुंब भेट दिली. शनिवारी पत्नी मॅकेंझी टटल, तीन मुलांसह ते औरंगाबादमध्ये आले होते. सुमारे दोन तास वेरूळ लेण्या पाहण्यात तेे दंग झाले होते. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या वेरुळ लेण्या आणि इथल्या कैलास मंदिराला स्थापत्यकलेतलं एक सर्वोत्कृष्ट शिल्प म्हटलं जातं. दोनशे फूट लांब, दीडशे फूट रुंद आणि १०० फूट उंच अशा खडकातून त्या कोरून काढलेल्या आहेत. एका महाकाय दगडातून एक विशाल दगड फोडून काढून पुन्हा त्यातून कोरून काढलेलं कैलास मंदिर हे जगातलं एकमेव मंदिर असावं असं म्हटलं जातं. युनेस्कोने १९८३ मध्ये वेरुळ लेणीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला. वेरुळ लेण्यांत खडकातून खोदून काढलेली अनेक बौद्ध, हिंदू आणि जैन मंदिरं आणि विहार आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६०च्या दशकात अजिंठा-वेरुळचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळं म्हणून प्रसार सुरू झाला होता. त्यामुळे या अद्भूत लेण्यांनी जेफ यांना भुरळ घातली नसेल तर नवल.

या अप्रतिम कलाकृतीनं जेफ यांच्यावर अक्षरश: मोहिनी घातली. सुमारे अडीच तास जेफ आणि त्यांचं कुटुंब या परिसरात होते. जेफ बेझोस यांनी २० वर्षांपूर्वी वेरूळ लेण्यांना भेट दिली होती. लेण्या पाहून झाल्यानंतर जेफ वाराणसीसाठी रवाना झाले.