मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका तरुणाने एका जिवंत भटक्या कुत्र्याला ब्रिजवरुन तलावात फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जवळपास २० वर्षांचा तरुण एका ब्रिजवरुन कुत्र्याला खाली तलावात फेकतो आणि कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून या प्रकारावर संताप व्यक्त केला जात होता. अखेर त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फक्त मजेसाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी भटक्या कुत्र्यासोबत केलेल्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी भोपाळच्या श्यामला हिल्स पोलीस स्थानकात याबाबत तक्रार केली होती. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण एका ब्रिजवर भटक्या कुत्र्याच्या बाजूला उभा असताना दिसतोय. नंतर थोड्यावेळात तो त्या कुत्र्याला अलगद उचलतो आणि काही क्षणांमध्येच खाली तलावात फेकून देतो. ब्रिजवर असलेल्या इतर कोणाच्याही हा प्रकार लक्षात येत नाही. त्यानंतर हा तरुण मोठा पराक्रम केल्यासारखा व्हिडिओमध्ये निर्लज्जपणे हसताना दिसतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत भोपाळच्या कलेक्टरांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती.


दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात कलम 429 अंतर्गत ( प्राणी क्रूरता) गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, घटनेनंतर कुत्रा जिवंत आहे की नाही, किंवा तो व्हिडिओ कोण शूट करत होतं याबाबतही अद्याप माहिती मिळालेली नाही.