चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला नासाचा ऑर्बिटर विक्रम लँडरला शोधण्यासाठी मदत करणार आहे. नासाच्या ऑर्बिटरने याआधी आपल्या कॅमेऱ्यात चंद्रावरील अनेक घडामोडी सूक्ष्मपणे टिपल्या आहेत. त्यामुळे विक्रम लँडरबद्दल ठोस माहिती मिळण्याची जास्त शक्यता आहे. नासाच्या या (एलआरओ) चंद्र मिशनची सुरुवात १८ जून २००९ साली झाली होती. अॅटलस व्ही रॉकेटने ऑर्बिटरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. पाच दिवसांनी २३ जूनला नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

१५ सप्टेंबर २००९ ला ऑर्बिटरने आपले शोध कार्य सुरु केले. चंद्रावर खनिज असलेल्या साधन संपत्तीच्या जागा, अनुकूल प्रदेश, भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमांसाठी अनुकूल पर्यावरण याविषयी माहिती गोळा करण्यात आली. १५ सप्टेंबर २०१० रोजी बरोबर एकावर्षाची एलआरओचे मिशन पूर्ण झाले. एलआरओमध्ये हाय रेसोल्युशनचा कॅमेरा बसवलेला आहे. ४० वर्षापूर्वीच्या अपोलो मिशनमधील चंद्रावरील मानवी पाऊल खूणा आपल्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद केल्या आहेत. नासाच्या ऑर्बिटरने चीनच्या चँग ३ आणि चँग ४ लँडरचे तसेच काही महिन्यांपूर्वी चंद्रावर क्रॅश लँडिंग केलेल्या इस्रायलच्या बेरेशीटचे सुद्धा फोटो काढले आहेत.

विक्रम लँडर चंद्राच्या ज्या भागावर आहे तिथून येत्या १७ सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जाणार आहे. त्यावेळी ऑर्बिटरमधून काढण्यात येणारे फोटो इस्रोकडे सोपवण्यात येतील. त्यावेळी विक्रमची नेमकी स्थिती काय आहे ते समजू शकेल. नासाच्या धोरणानुसार एलआरओवरील सर्व डाटा वेबसाइटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. इस्रोला त्यांच्या विश्लेषणात मदत व्हावी यासाठी नासा विक्रम लँडरच्या लँडिंगच्या जागेचे फोटो इस्रोला पाठवणार आहे.

सात सप्टेंबरला मध्यरात्री विक्रम लँडर चंद्रावर उतरणार होता. ठरल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु होते. पण अखेरच्या काही मिनिटांमध्ये विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विक्रमने चंद्रावर सॉफ्टऐवजी चंद्रावर हार्ड लँडिंग केले. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना हा संपर्क तुटला. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने विक्रमच्या लँडिंगच्या जागेचा फोटो काढला आहे. पण त्यावरुन सध्या विक्रमची नेमकी स्थिती कशी आहे ते अजूनही स्पष्ट केलेले नाही. विक्रम एकसंध असून तो तुटलेला नाही असे इस्रोच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त देण्यात आले होते. पण इस्रोने अजून या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.