ट्रेकिंग दरम्यान सुब्रहमण्यच्या जंगलात भरकटलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा अखेर दोन दिवसांनी शोध लागला आहे. संतोष (२५) असे या तरुणाचे नाव आहे. बंगळुरुमध्ये राहणारा संतोष बारा जणांच्या ग्रुपसोबत ट्रेकिंगसाठी गेला होता. वाट चुकल्यामुळे संतोषला दोन रात्री जंगलात काढाव्या लागल्या. खाण्या-पिण्यासाठी जवळ काही नव्हते. त्यामुळे त्याला फक्त पाण्यावरती हे दोन दिवस काढावे लागले. रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संतोष मार्ग चुकला. बाहेर येण्यासाठी त्याला वाट सापडत नव्हती.

त्यावेळी जंगलातून जाणाऱ्या पाइपलाइनच्या मदतीने मार्ग शोधत संतोष मंगळवारी दुपारी कुक्के सुब्रहमण्य मंदिराजवळ असणाऱ्या कल्लुगुंडी येथील एका व्यक्तीच्या घरी पोहोचला. कुमारपर्वता येथे ट्रेकिंगला जाण्यासाठी शनिवारी १२ जणांचा ग्रुप बंगळुरुहून आला होता. त्यांना त्याच दिवशी ट्रेकला निघायचे होते. पण उशिर झाल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी नाकारली. चेकपॉईंटपासून कुमारपर्वतापर्यंतचे अंतर ५ किमी आहे. चेकपॉईंटजवळ त्यांनी तंबू ठोकला व रविवारी सकाळी ट्रेकिंगसाठी निघाले. १२ जणांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले.

संतोष दुसऱ्या ग्रुपमध्ये होता. सकाळी सात वाजता ट्रेकला सुरुवात केल्यानंतर ते शिखरावर पोहोचले. दुपारी ३.३० वाजता एका स्थानिकाच्या घरी दुपारच्या भोजनासाठी पोहोचले. इथे स्थानिकांकडून ट्रेकर्ससाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. पहिला ग्रुप भट यांच्या घरी पोहोचला व तिथे भोजन करुन चार वाजता निघाला. संतोषचा ग्रुप ४.३० वाजता भट यांच्या घरी पोहोचला. रविवारी एकूण ५४ जण ट्रेकसाठी कुमारपर्वता येथे गेले होते.

ग्रुपमधील दुसऱ्या सदस्यांचे जेवण पूर्ण होण्याआधी संतोषने आपले जेवण उरकले व जिथून ट्रेक सुरु केला होता तिथे जाण्यासाठी तो निघाला. भट यांच्या घरापासून काही अंतरावर रस्त्याला फाटा फुटतो. संतोष सरळ जाण्याऐवजी उजव्या बाजूला वळला. तिथून संकटांची मालिका सुरु झाली. संतोषला दोन रात्री घनदाट जंगलात काढाव्या लागल्या. मंगळवारी ४५ जणांच्या पथकाने संतोषचा शोध सुरु केला होता.

“भट यांच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असताना मी मार्ग चुकलो. मी रस्ता चुकलोय हे मला कळलं. पण मला योग्य मार्ग सापडेल या अपेक्षेने मी चालत होतो. माझ्या मोबाइलची बॅटरीही संपली होती. रविवारची रात्र मी जंगलातील एका खडकावर झोपून काढली. सोमवारचा संपूर्ण दिवस मी चालत होतो. भूक शमवण्यासाठी धबधब्यावरच पाणी पिऊन तो दिवस काढला. त्या दिवशीही नशीब माझ्या बरोबर नव्हते. जंगलात मला दोन ते तीन साप दिसले. सुदैवाने कुठल्या जंगली प्राण्याबरोबर सामना झाला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी मला पाण्याची पाइपलाइन दिसली. त्यामुळे माझ्या मनात बाहेर पडण्याची अधुंकशी आशा निर्माण झाली. अखेर त्या पाइपलाइनच्या मदतीने चालत मी कुक्के सुब्रहमण्य मंदिराजवळच्या एका व्यक्तीच्या घरी पोहोचलो” असा अनुभव संतोषने सांगितला. कल्लुगुंडी येथे संतोषला जेवण देण्यात आले. संपूर्ण तपासणीत तो फिट असल्याचे समजल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.