महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल नेटवर्किंगवर चांगलेच अ‍ॅक्टीव्ह आहेत. अगदी व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या फोटोंपासून सुविचारांपर्यंत आणि वेगवेगळ्या कल्पना ते ट्विटवरुन मांडत असतात. अनेकदा त्यांनी केलेले ट्विटव व्हायरल झाल्याचे पहायला मिळते. मात्र त्यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्विटमुळे आनंद महिंद्रा करोना लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होमदरम्यान घरातील कपड्यांमध्येच काम करतात का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. सध्या त्यांनी पोस्ट केलेल्या एका मजेदार फोटोवर ही चर्चा रंगली आहे.

झालं असं की आनंद महिंद्रांनी एका लुंगीच्या जाहिरातीच्या होर्डिंगचा फोटो पोस्ट केला आहे. या होर्डिंगमध्ये एका लुंगीच्या ब्रॅण्डची जाहिरात करण्यात आली आहे. होर्डींगवर एक पुरुष लुंगी घालून उभा आहे. “केरळातील अधिकृत वर्क फ्रॉम होम ड्रेस” अशी ओळ या होर्डिंगवर लिहिलेली आहे. फॉर्मल शर्ट आणि लुंगी घातलेल्या व्यक्तीचे हे होर्डिंग केरळमधील नक्की कोणत्या शहरात लावण्यात आले आहे याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मात्र आनंद महिंद्रा यांनी याच होर्डिंगचा फोटो पोस्ट करत माझ्यावर कोणी नजर ठेवतयं का असा प्रश्न उपस्थित केला आहे. “कोणी माझी रेकी करत होतं का?”, अशा कॅप्शनसहीत महिंद्रांनी हा फोटो ट्विट केला आहे.

या फोटोला २१ हजारहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. यापूर्वीही आनंद महिंद्रांनी वर्क फ्रॉम होमदरम्यान काम करणाऱ्यांचा अवतार कसा असतो याबद्दल ट्विट केलं होतं.  या फोटोमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करणारा एक कर्मचारी लुंगीवर काम करत आहे. याच फोटोचा आधार घेऊन महिंद्रा यांनी एक गुपित साऱ्यांशी शेअर केलं आहे. “एक मजेदार फोटो माझ्या व्हॉट्सअपवर आला आहे. हा फोटो पाहून मला एक कबुली द्यावीशी वाटते आहे. मी जेव्हा घरात असतो, तेव्हा व्हिडीओ कॉलवर बोलताना बऱ्याचदा मी लुंगी आणि वर शर्ट घातलेला असतो. मला मिटिंग सुरू असताना उभं राहायचं नसतं, त्यामुळे तसं करणं चालून जातं. पण आता मला भीती आहे की कदाचित पुढच्या वेळेपासून मला माझे सहकारी व्हिडीओ कॉलदरम्यान उभं राहायला सांगतील”, असे ट्विट महिंद्रा यांनी केलं होतं.

एकंदरितच हे दोन्ही ट्विट पाहता भारतातील आघाडीच्या वाहन निर्मिती कंपनीचे प्रमुख असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी सर्व सामान्यांप्रमाणेच घरुन काम करताना ड्रेसकोडला सुट्टी दिली आहे असंच म्हणता येईल.