Viral Video Bull Attack On Women : उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यातील बाबिना गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गावातील एका अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या अंगावर एक भटकणारी म्हैस धावून आली आणि तिने महिलेवर जोरदार हल्ला केला. म्हशीने महिलेला आपल्या शिंगांनी अक्षरशः हवेत भिरकावून जमीनवर आपटले त्यामुळे त्या महिलेला गंभीर जखम झाली आणि ती बेशुद्ध पडली.
ही संपूर्ण घटना रस्त्यावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि ही १७ सेकंदांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, महिला सुरुवातीला रस्त्यावर शांतपणे चालत आहे, पण अचानक तिला म्हैस दिसते आणि ती घाबरून मागे वळते. मात्र संतापलेल्या म्हशीने महिलेला एवढ्या जोरात धडक दिली की ती हवेत उचकटून जमिनीवर आपटली.
महिला हवेत कित्येक फूट उचलली गेल्यानंतर जमिनीवर पडते आणि काही वेळ हालचालही करत नव्हती. म्हशीचा संताप पाहून आसपासचे लोक घाबरून पळाले. पण काही क्षणांनी एका मोटारसायकलस्वाराने धाडस दाखवत म्हशीला हुसकावून लावलं आणि परिस्थिती आटोक्यात आणली.
त्याचप्रमाणे राजस्थानमधील जोधपूरमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली. २२ सप्टेंबर रोजी जोधपूरच्या मांडोरे परिसरातील चैनपुरा बावडी येथे एका ६० वर्षीय महिलेला अचानक भटक्या म्हशीने जोरदार धडक दिली. संतापलेल्या म्हशीने तिला तब्बल चार फूट उचलून भिंतीवर आपटले, ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
पाहा व्हिडिओ
ह्या दोन्ही घटना भटकणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचे गंभीर उदाहरण आहे. रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या म्हशींवर नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा भटक्या जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे.
विशेष म्हणजे, झाशीतील बाबिना गावातील घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी भटक्या म्हशींच्या हल्ल्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे
स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, भटक्या म्हशींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात ठोस व्यवस्था करावी आणि अशा प्रसंगी नागरिकांना त्वरित मदत मिळावी. झाशीतील घटनेत एका मोटारसायकलस्वाराच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणं अत्यावश्यक आहे.ही घटना नागरिकांना एक महत्त्वाचा इशारा देते की, रस्त्यावर भटक्या म्हशींपासून नेहमीच सावध राहणं गरजेचं आहे.