रविवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील शक्य त्या सर्व मुद्द्यांवर सध्या क्रिकेट चाहते, जाणकार व तज्ज्ञांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे. मग ती दोन्ही संघांच्या जमेच्या बाजूंची असे किंवा कमकुवत दुव्यांची! पण याचबरोबर अशा मोठ्या सामन्यांच्या आधी वर्तवण्यात येणाऱ्या भाकितांचीही जोरदार चर्चा होत असते. अनेक आजी-माजी खेळाडूंनी या सामन्याबद्दल त्यांची भाकितं वर्तवली आहेत. पण त्यातलं एक भाकित सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शनं तब्बल सहा महिन्यांपूर्वी हे भाकित केलं होतं!

मे महिन्यात म्हणाला होता, भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होईल!

मे महिन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या एका पॉडकास्टमध्ये मिचेल मार्शला विश्वचषक स्पर्धा व अंतिम सामन्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर बोलताना मार्शनं यंदाच्या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल, असं भाकित वर्तवलं होतं. त्याचं हे भाकित अगदी तंतोतंत खरं ठरलं आहे. त्यामुळेच यावेळी त्यानं सांगितलेल्या इतर अंदाजांचीही चर्चा होऊ लागली आहे. पण स्पर्धेत दोन्ही संघांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहाता मिचेल मार्शनं वर्तवलेलं हे भाकित उलटच होण्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत!

काय आहे मार्षचं अंतिम सामन्यासाठीचं भाकित?

मार्शनं भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल असं म्हटलं होतं. पण त्याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिली फलंदाजी करताना फक्त २ गड्यांच्या मोबदल्यात ४५० धावा फटकावेल असंही तो म्हणाला होता. उत्तरात आख्खा भारतीय संघ ६५ धावांवर सर्वबाद होईल आणि ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अजेय राहून विश्वचषक जिंकेल, असं मार्शनं म्हटलं होतं!

World Cup 2023 : रोहित शर्माच्या ‘त्या’ फोटोने कांगारुंची झोप उडवली, ऑस्ट्रेलियन फलंदाज चिंतेत, नेमकं कारण काय?…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता जरा दोन्ही संघांच्या कामगिरीकडे पाहू…

खरंतर मार्शनं सहा महिन्यांपूर्वीच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचं केलेलं भाकित चर्चेचा विषय ठरलं यात नवल नाही. पण त्याच्या इतर मुद्द्यांचा विचार करता हे भाकित उलट सिद्ध होण्याची शक्यताच सध्या अधिक वाटतेय. ऑस्ट्रेलियाऐवजी भारतीय संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजेय राहिला आहे. उलट भारतानं पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला आहे. शिवाय भारतीय फलंदाजांची व गोलंदाजांची कामगिरी पाहाता भारताच्या २ बाद ४५० धावा व ऑस्ट्रेलिया ६५ वर सर्वबाद होण्याची शक्यता अधिक असल्याचं चाहते सोशल मीडियावर सांगू लागले आहेत. त्यामुळे रविवारच्या सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.